
घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे खासदार आज दिल्लीत ‘लोकशाही वाचवा मोर्चा’ काढणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन ते निवडणूक आयोग सदनापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण रस्त्यावर शसस्त्र सीमा दलाचे जवान तैनात आहेत. त्यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. तसेच ”आमच्यावर दंडुके चालवले, बंदूका रोखल्या तरी आम्ही निवडणूक आयोगाच्या सदनापर्यंत जाणारच”, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. संजय राऊत यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विविध विषयावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
”संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या सदनापर्यंत विरोधी पक्षांच्या खासदारांचा मोर्चा आहे. राज्यसभा, लोकसभेतील अडीचशे ते पावने तीनशे खासदार उपस्थित राहतील. या संपूर्ण रस्त्यावर सरकारने सशस्त्र दलाच्या तुकड्या लावल्या आहेत. नाकाबंदी केली आहे. सगळं बंद केलं आहे. बॅरिकेड्स लावले आहेत, रस्ते बंद केले आहेत. तुम्ही संसद चालू देत नाही. संसदेत बोलू देत नाही. जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो तेव्हा आमच्यावर काठ्या लाठ्या उगारता ही कोणती लोकशाही आहे? हे सरकार खासदारांना घाबरायला लागले आहे. जे खासदार पाच दहा लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करतात त्या खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यापासून रोखणं हे लोकशाहीच्या कुठल्या तत्वात बसतं? आम्हाला आमचं निवदेन द्यायचं आहे, एसआयआरमध्ये घोटाळे करून भाजपला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही निघालो आहोत. जग बघतंय की कशा प्रकारे हिंदुस्थानात नरेंद्र मोदी- अमित शहांच्या सरकारमध्ये या देशाचा निवडणूक आयोग लोकशाहीची कशी हत्या करतंय. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही जाऊच, दंडुके चालवले, बंदूका रोखल्या तरी आम्ही निर्वाचन सदन पर्यंत जाऊच”, असे संजय राऊत म्हणाले.
”आप ने देखील या मोर्चात उतरायला हवे, कुणीही स्वतंत्रपणे चूल मांडून ज्ञानेश कुमार विरोधातील लढाई लढू शकत नाही. ज्ञानेश कुमार हे मोदी शहांचे हस्तक आहेत. एजंट आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला अहंकार, आपले मतभेद बाजूला ठेवून या लढाईत उतरायला हवं. स्वातंत्र्य लढ्यात त्यावेळी काँग्रेससोबत डावे पक्ष, समाजवादी सर्व उतरले होते. त्यामुळे त्या आंदोलनाला एक तेज आलं होतं”, असेही संजय राऊत म्हणाले.



























































