
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेटला ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवणारी विश्वविजेती कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर तिने अचानक हा निर्णय घेतल्याने क्रिडा रसिकांना धक्का बसला आहे.
हरमनप्रीतने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) कर्णधारपद सोडत असल्याचे स्पष्ट केले. कर्णधारपद सोडले असले, तरी एक खेळाडू म्हणून ती संघात खेळत राहील.
“आज मी महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा निर्णय सोपा नव्हता. यामध्ये अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे क्षण सामावले आहेत जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मी या संघासाठी आणि हिंदुस्थान महिला क्रिकेटसाठी माझे सर्वस्व पणाला लावले. माझे रक्त, घाम, वेळ आणि अनेकदा माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा त्याग केला. माझ्यासाठी संघ नेहमी पहिल्या स्थानी होता. एक कर्णधार म्हणून मला कठीण निर्णय घ्यावे लागले, ज्यांचे मोल कधीकधी मला वैयक्तिक पातळीवर मोजावे लागले. पण माझा प्रत्येक निर्णय हा संघ अधिक चांगला व्हावा आणि इतर खेळाडूंना घडण्याची संधी मिळावी याच हेतूने घेतला होता.” असे हरमनप्रीत कौरने पोस्ट केले आहे.
३७ वर्षीय हरमनप्रीतने कर्णधार म्हणून २०१२ मध्ये पहिल्यांदा महिला टी-२० आशिया चषक जिंकून दिला होता. त्यानंतर २०१६ मध्ये तिच्याकडे पूर्णवेळ कर्णधारपद सोपवण्यात आले. तिच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या महिला संघाने अनेक सुवर्णक्षण अनुभवले.
स्मृती मंधानाकडे धुरा सोपवण्याची शक्यता
गुवाहाटी येथे बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवाजित सैकिया यांच्यासोबत हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्यात संघाच्या भविष्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर हरमनप्रीतने हा निर्णय घेतला. १६ ऑक्टोबरपासून झिम्बाब्वेचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत असून, त्या पार्श्वभूमीवर संघाच्या नव्या कर्णधाराची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. उपकर्णधार स्मृती मंधाना आता तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची नवी कर्णधार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.




























































