
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांनी महाराष्ट्र पोलिसांनी आमचं हॉर्ट ब्रेक केलं अशा शब्दात प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यासाठी सीजेपीने जन आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन करण्याच्या इशारा दिल्यानंतर या आंदोलनासाठी जाण्याची शक्यता असलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस धाडली आहे. चंद्रपूर येथील सीजेपीच्या कार्यकर्त्यांना अशा नोटीसा आल्याचे अभिजित दिपके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
अभिजित दिपके यांनी आज माध्यमांशी बोलताना नोटीसीमधील मुद्दे वाचून दाखवले. चंद्रपूर पोलिसांनी नोटीसीत म्हटले आहे की, आपण जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी होऊ नये. जंतरमंतर वरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत जाणार आहात तर याच खर्च कुठून होतो आहे? अशी माहिती देखील विचारण्यात आली आहे. यासोबतच जंतरमंतरवरील आंदोलन हे हिंसक होणार असल्याचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला असल्याचे अभिजित दिपके यांनी म्हटले आहे. आंदोलन हिंसक होणार असल्याचे चंद्रपूर पोलिसांना आधीच कसे काय माहित आहे? का यांनी आधीच प्लान करून ठेवला आहे? अशी शंका उपस्थित दिपके यांनी उपस्थित केली आहे. हिंसा होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नका असाही उल्लेख नोटीसमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हाच मुद्दा पकडत त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना म्हटले आहे की आमच्याकडून असे काही पोस्ट झाले असल्यास दाखवून द्यावे. आम्ही सतत महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलत आहोत, ते तुम्हाला हिंसक वाटत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखे का वागत आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
महाराष्ट्राचा मुलगा दिल्लीला आंदोलनासाठी जात असल्यास हजार – दीड हजाराचे तिकिटही मुलगा काढू शकत नाही का? खर्च कुठून येतो हे चंद्रपूर पोलिसांना काय करायचे आहे? काय प्रश्न विचारत आहात? जंतरमंतरला जाऊ नका असे का म्हणत आहात? अशा प्रकारे प्रश्न विचारणे म्हणजे नागरिकांवर तुमचा मालकी हक्क आहे का? ही तर हुकूमशाही असल्याचे दिपके म्हणाले. एकीकडे मराठी मुलगा दिल्लीत जाऊन तिथल्या पोलिसांना डोळ्यात डोळे टाकून म्हणत आहे की तुम्ही महाराष्ट्र पोलिसांकडून शिका तर इकडे महाराष्ट्र पोलिसांनी अशी नोटीस पाठवली आहे. तुम्ही स्वाभिमान जपा, आपण दिल्ली पोलिसांसारखे नाहीत. जंतरमंतर हे चंद्रपूर पोलिसांच्या हद्दीत येत नाही, असा टोलाही दिपके यांनी लगावला आहे. कुणाच्या सांगण्यावरून या नोटीसी धाडण्यात आल्या आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं, आपला महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास, महाराष्ट्र पोलीस चांगले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसाठी लढू नये?
आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. आमदार, खासदार किंवा उद्योगपतीचा मुलगा असता तर त्याला मारण्याची भाषा करणार का? त्याच्यावर दबाव टाकणार का? असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले.




























































