होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर हल्ला, 11 हिंदुस्थानी खलाशी जखमी; परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझच्या सामुद्रधुनीत मंगळवारी पनामा ध्वजांकित एमटी ऑन पीस या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात 11 हिंदुस्थानी खलाशांसह 12 कर्मचारी जखमी झाले आहेत. ओमानच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमी कर्मचाऱ्यांना जहाजातून बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींवर ओमानमधील खसाब येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंदुस्थानने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, जहाजावर 17 हिंदुस्थानी नागरिकांसह एकूण 19 कर्मचारी होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आणि तिच्या आसपास व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असतानाच एमटी ऑन पीसवर हल्ला झाला आहे.

या प्रदेशात जहाजांवर होणारे सततचे हल्ले ही चिंतेची बाब असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी हे हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन मंत्रालयाने केले. या प्रदेशात व्यापारी जहाजे, खलाशी आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबले पाहिजे. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून होणारी जहाजवाहतूक आणि व्यापार शक्य तितक्या लवकर पूर्ववत केला पाहिजे, असे परराष्ट्र मंत्रालयाने पुढे नमूद केले.