
टीम इंडियाचा आक्रमक चेहरा आणि माजी कर्णधार सौरव गांगुली आता दिल्ली पॅकॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी गांगुली यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये क्रिकेट संचालक म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या गांगुलींच्या हाती आता संघाच्या मैदानावरील कामगिरीची सूत्रे असतील. गांगुली यांनी 2025 मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली कोचिंग जबाबदारी स्वीकारली होती. आता आयपीएलमध्ये दिल्लीला पहिलेवहिले विजेतेपद मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप आयपीएलच्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. 2020 मध्ये संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली, मात्र मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. आता गांगुलींच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळतो का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष असेल.





























































