16 वर्षांपूर्वी जिथे 13 जणांचा जीव घेतला, तिथेच आरोपीला ठार मारणार; अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मृत्युदंडाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला होणाऱ्या मृत्युदंडाच्या शिक्षेची प्रक्रिया आतापर्यंत गुप्त ठेवली जात होती. मात्र आता अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका दोषी व्यक्तीच्या मृत्युदंडाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. अमेरिकन सैन्यातील माजी अधिकारी आणि मानसोपचारतज्ज्ञ निदाल हसन याला 2009 मध्ये टेक्सासमधील फोर्ट हुड लष्करी तळावर गोळीबार करून 13 सैनिकांच्या हत्या केल्याप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी निदास याला शिक्षा देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी निदास याने 16 वर्षांपूर्वी 13 सैनिकांची हत्या केली तिथेच त्याला मृत्युदंड देण्यात येणार असून या शिक्षेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्याची योजना असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी याचे समर्थन करत अशा गुन्ह्यांचा परिणाम काय होतो हे लोकांसमोर यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र यावरून जगभरात वाद सुरू झाला आहे. दरम्यान, हसन याला मृत्युदंड देण्याच्या निर्णयाविरोधात कायदेशीर अपील करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ‘रॉयटर्स‘ने पेंटागॉनच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

निदाल हसन हा अमेरिकन सैन्यातील माजी अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे. 5 नोव्हेंबर 2009 रोजी त्याने फोर्ट हुड लष्करी तलावर धार्मिक घोषणाबाजी करत अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. अमेरिकन सैन्य तळावर घडलेली ही इतिहासातील सर्वात गंभीर गोळीबाराची घटना मानली जाते. हल्ला झाला तेव्हा अमेरिका इराण आणि अफगाणिस्तान युद्धात उतरलेला होता. हे युद्ध बेकायदेशीर आणि अनैतिक असल्याचे निदाल मानत होता. तसेच आपण जिहादच्या उद्देशानेच हा हल्ला केल्याची कबुलीही त्याने दिली.

गोळाबारादरम्यान निदालही जखमी झाला होता. त्यानंतर त्याला अर्धांगवायुचा झटका आला आणि त्याचे कमरेखालच्या शरीराची हालचाल बंद झाली. त्याच्यावर सैन्य न्यायालयात खटला चालवण्यात आला. त्याच्यावर हत्या आणि हत्या करण्याचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले. 2013 मध्ये सैन्य न्यायालयाने त्याला पूर्वनियोजित हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा एकूण 45 प्रकरणात दोषी ठरवले आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हा खटला सुरू असताना निदाल याने आपण केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले होते. उलट या हल्ल्यादरम्यान आपलाही मृत्यू झाला असता तर शहीदाचा दर्जा मिळाला असल्याचे त्याने म्हटले. तसेच मृत्युदंडाची शिक्षा झाली तर आपण स्वत:ला शहीद मानू असेही त्याने म्हटले होते.