
अमेरिकेत नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत बेकायदेशीरपणे मतदार म्हणून नोंदणी करून मतदान केल्याप्रकरणी कॅलिफोर्नियामध्ये 28 ग्रीन कार्ड धारकांवर फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन हिंदुस्थानी नागरिकांचा देखील समावेश असल्याची माहिती ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पीटीआय) ने दिली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, अमनदीप कौर (30) आणि कमलेश शहा (67) अशी आरोप झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांची नावे आहेत. अमेरिकेचे नागरिक नसतानाही या दोघांनी बेकायदेशीरपणे मतदार म्हणून नाव नोंदवले आणि मतदानाचा हक्क बजावला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
न्याय विभागाच्या माहितीनुसार, सॅक्रमेंटो येथे राहणाऱ्या शहा यांनी नोव्हेंबर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशीच मतदार नोंदणी करून मतदान केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, रॅंचो पालोस वर्देस येथे राहणाऱ्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याच्या प्रक्रियेत असलेल्या कौर यांनी डिसेंबर 2022मध्ये मतदार म्हणून नाव नोंदवले होते आणि 2024 च्या निवडणुकीत मतदान केले होते.
न्याय विभागाच्या ‘ऑपरेशन प्रोटेक्ट द व्होट’ या उपक्रमांतर्गत कॅलिफोर्नियामध्ये सकाळच्या सुमारास टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये 11 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, या 11जणांमध्ये या दोन हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान हा आरोप सिद्ध झाल्यास खोटी विधाने करणे आणि फसव्या पद्धतीने मतदार नोंदणी करणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी या दोन हिंदुस्थानी नागरिंकांना प्रत्येकी पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.





























































