
सामना ऑनलाईन,जोरहट
दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एएन-32 विमानातील सर्व जवान शहीद झाल्याची घोषणा आज हवाई दलाने केली. अरुणाचल प्रदेशातील लिपोच्या दुर्गम डोंगररांगांतून 13 प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशात आणण्यात येणार आहेत.

तीन जून रोजी आसामातील जोरहट येथून अरुणाचल प्रदेशकडे उड्डाण केलेले लष्कराचे एएन-32 विमान रडारवरून अचानक बेपत्ता झाले. अरुणाचल प्रदेशच्या लिपा या दुर्गम डोंगरराजीत विमान गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. विमानाच्या शोधासाठी सुखोईसह इतर विमानांची मदत घेण्यात आली. नऊ दिवसांनंतर लिपोच्या अतिशय घनदाट जंगलात विमानाचा मलबा आढळून आला. गरुड कमांडोच्या मदतीने विमानातील तेरा मृतदेहांचे विखुरलेले अवशेष गोळा करण्यात आले.

दुर्घटनेत शहीद झालेले जवान
या दुर्घटनेत विंग कमांडर जी.एम. चार्ल्स, स्क्वार्ड्रन लीडर एच. विनोद, फ्लाईट लेफ्टनंट आर. थापा, फ्लाईट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाईट लेफ्टनंट एस. मोहंती, फ्लाईट लेफ्टनंट एम.के. गर्ग, वॉरंट ऑफिसर के.के. मिश्रा, सार्जंट अनुपकुमार, कॉर्पोदल शेरीन, लिडिंग एअरक्राफ्ट पंकज, लिडिंग एअरक्राफ्ट एस.के. सिंह, नॉन कॉम्बेट पुतळी व नॉन कॉम्बेट राजेश हे शहीद झाले. वायुसेनेने ही अधिकृत घोषणा केली.




























































