
शिवडीसह लालबाग, परळ हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिलेला आहे. या ठिकाणची जनता, शिवसैनिक हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे निष्ठावंतांचा शिवडी गड शिवसेना राखणारच असा ठाम विश्वास शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला. शिवडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिवडी, परळ आणि लालबाग परिसराला आपण एक परिवार समजतो. त्यामुळे या ठिकाणी आल्यावर आपल्या परिवारातच आल्यासारखे वाटते असेही आदित्य ठाकरे म्हणाले. या ठिकाणचे शिवसैनिकही निष्ठावंत आहेत. आमदार अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ, सुधीर साळवी, आशीष चेंबूरकर यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे. त्यामुळेच सर्वजण एकजुटीने काम करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘आप’चाही पाठिंबा असल्याने शिवसेना शिवडीचा गड राखणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, माहीम मतदारसंघात कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारा निष्ठावंत शिवसैनिक महेश सावंत यांच्या रूपाने विधानसभेसाठी उभा आहे. लोकांमध्ये राहणारा, पक्ष आणि भूमिका न बदलणारा माणूस असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र मिंधे-भाजपच्या हाती द्यायचा नाही
महाराष्ट्र लुटणाऱया मिंधे-भाजपच्या हाती पुन्हा राज्य द्यायचे नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. ही लढाई आता निर्णायक बनली आहे. त्यामुळे कोणतीही सीट गेली तर संपूर्ण महाराष्ट्राचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री हवा अशी भूमिका घेणारे महाराष्ट्रद्रोही असल्याचा घणाघातही त्यांनी केला. शिवाय ‘आयटम साँग’ लावून प्रचार करणारे महाराष्ट्राची सेवा काय करणार असेही ते म्हणाले. प्रत्येक पक्षाने कोण कुणाच्या बाजूने आहे हे जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
























































