
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांवर काल सरकारने दडपशाही करत अनेकांना मारहाण केली. पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. न्याय मागण्यांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांवर सरकार दडपशाही का करत आहे? असा संतप्त सवाल जनता करत आहे. या घटनेचा शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच भाजप देशद्रोही, विद्यार्थीद्रोही असून त्यांच्या मनात शिक्षणाविषयी द्वेष आहे. याविरोधात आपल्याला एकवटून याचा सामना करावाच लागेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या दडपशाहीविरोधात तोफ डागली. काल झालेल्या मोर्च्यात उत्स्फूर्त मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. एकेकाळी लोकशाही असायची अशा संसदे भवनच्या दिशेने हा मोर्चा निघाला. मात्र, विद्यार्थ्यांशी बोलायला एकही मंत्री किंवा नेता आला नाही. गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानही कोणी आले नाही. याआधी अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू होते, तेव्हा मनमोहन सिंग सरकारमधील पाच मंत्री चर्चेसाठी पुढे आले होते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनमागे असलेल्या भाजपशी, विरोधी पक्षांशी आणि संबंधितांशी सरकार चर्चा करत होते. त्याकाळी सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. मात्र, आता भाजप चर्चेएवजी दडपशाहीचा मार्ग अवलंबत आहे, याचा आदित्य ठाकरे यांनी निषेध केला.
भाजपच्या राजवटीचा काल भयानक क्रूर चेहरा जनतेसमोर आला आहे. ब्रिटीशकालीन अत्याचारापेक्षा भंयकर अत्याचार काल दिसून आला. लहान मुलांना, महिलांनाही मारहाण करण्यात आली. लाठीजार्च करण्यात आला. अश्रूधराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच या रॅपिड एक्शन फोर्सने त्यांच्या नावाच्या पाट्याही काढल्या होत्या. असा भयंकर प्रकार काल दिल्लीत दिसला. हिंदुस्थानी नागरिकांवर भयानक, अमानूष लाठीचार्ज करण्यात आला. कोणासाठी आंदोलन होतंय, एवढी संवेदनशीलताही त्यांनी ठेवली नाही. याआधी शेतकऱ्यांवरही याच सरकारने गोळीबार आणि लाठीचार्ज केला होता. त्यामुळे हेस सरकार विद्यार्थी आणि शतकरीविरोधी आहे, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबईतही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन केले. हे आंदोलन सुरू असताना त्यांना पोलिसांच्या गाडीत कोंबून नेण्यात आले. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत त्यांची सुटका केली. आता भाजपच्या सरकारने या मुलांना नोटीस पाठवली आहे. तसेच एफआयआरसाठी बोलवण्यात आले आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. राज्यात या विषयासाठी आंदोलन होत आहेत. त्याबाबत नोटीस आली किंवा काही दडपशाही झाली तर आमच्याशी संपर्क करा. त्यासाठी आम्ही ईमेल अॅड्रेस तयार केला आहे. जर कोणी शांततापूर्ण आंदोलन करत असेल आणि नोटीस आली तर [email protected] यावर संपर्क साधा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आपण या तरुणांना साथ देणे, पाठिंबा देणे गरजेचे आहे. यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विधीज्ञ अशा प्रकारांना हातळणार आहेत. यासाठी वकील, अॅडव्होकेट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
देशद्रोही भाजप सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परदेशातही आंदोलने शांततेत होतात. तिथे कोणा विरोध करत नाही. मात्र, देशातील तरुण रस्त्यावर उतरले तर भाजप सरकारला ते सहन होत नाही. भाजप नेत्यांचा आणि शक्षणाचा काही संबंध नाही. देशात विद्यार्थ्यावर लाठीचार्ज होत आहे, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आता एबीव्हीपी संघटना कुठे आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी पाठिंबा दिला आहे. उद्या ते विद्यार्थ्यांना भेटायलाही जाणार आहेत. आता आपण सर्वांनी एकत्र येत हा लढा देणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजप देशद्रोही, विद्यार्थीद्रोही आहे आणि त्यांच्या मनात द्वेष आहे. भाजपच्या मनात विद्यार्थी आणि शिक्षणाबद्दल असलेला द्वेष दिसून आला आहे. सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके आंदोलन करत आहेत. सर्व विरोधी पक्ष इंडिया आघाडी विद्यार्थांसोबत आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे, असे ते म्हणाले.
15 ते 20 वर्षांची मूलं देशविरोधी गोष्टी कशा करू शकतात, तसेच 12 वर्षे फडणवीस गृहमंत्री आहेत. 7 वर्षे मुख्यमंत्री आहेत, तरीही बाहेरील शक्ती अप्रिय घटना करू शकतात, अशी भीती सरकारला वाटत असले तर फडणवीस कायदा, सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. हे राजकीय आंदोलन नसून हे तरुणांच्या भवितव्यासाठी केलेले आंदोलन आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
देशासाठी वक्तव्य करणे, विद्यार्थी, शिक्षण व्यवस्था, शेतकरी, देशातील समस्या याबाबत बोलल्यावर भाजपला त्रास होतो. पाकिस्तान, चीन यांचा विषय आला की भाजपला त्रास होतो. जे असे विषयांवर बोलतात, त्यांनी देशद्रोही ठरवण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटले जात आहे. विद्यार्थी, शेतकरी यांना दहशतवादी ठरवणारे हे सरकार आहे. मात्र, आता देशातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत, या आंदोलनाचा आवाज आता देशभरात घुमत आहे. आपण त्यांना पाठिंबा देत एकत्र येण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.





























































