
>>आरती जाधव
नववर्षांची सुरुवात म्हटलं तर सरत्या वर्षात करायच्या राहून गेलेल्या बऱयाच गोष्टी नवीन वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प प्रत्येक जण आखत असतो. दरवर्षी 1 जानेवारीला आपण स्वतःला अनेक वचन देत असतो. मात्र रोजच्या धावपळीत हे पूर्ण करणं राहून जातं. यात फिटनेस हे महत्त्वाचं वचन स्वतःला प्रत्येक जण देत असतो. मुळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे, यात शंकाच नाही. कारण पूर्वी तरुणांमध्ये लोकप्रिय असणारा फिटनेस हा कोरोना काळानंतर प्रत्येकाचा आवडता कधी झाला हे कळलंच नाही. आज प्रत्येकाला फिट राहायचं आहे, दिसायचं आहे. प्रत्येकाचा फिटनेस प्रवास वेगळा असला तरी व्यायामाच्या नवीन कल्पना, प्रेरणा आणि मैत्रीपूर्ण सल्ल्यासाठी अनेक जण सध्या इंटरनेटचा आधार घेताना दिसून येत आहेत, परंतु व्यायामाचे धडे अशा प्रकारे घेणं धोकादायक ठरू शकतं. या नव्या वर्षी फिट राहण्याचा विचार करत असाल तर मोबाइल अॅपद्वारे व्यायाम करताना काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे.
अनेक जण सोशल मीडियावर वजन कसं कमी केलं याबाबत आपला अनुभव शेअर करतात. यात काहीही गैर नाही, परंतु हे पाहून बरेच लोक इंटरनेट आणि यूटय़ूबच्या माध्यमातून वजन कमी करण्याचे उपाय शोधून काढत आहेत. यूटय़ूबद्वारे व्यायामाच्या कसरती बघून करून घरी वजन कमी झालं नाही तर उदास होतात. सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटेदेखील आहेत. फक्त चांगल्या गोष्टींचे प्रदर्शन समोर मांडले जाते, परंतु होणारे साईड इफेक्ट्स कोणीही अपलोड करून सांगत नाही.
तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, योग प्रशिक्षक किंवा जिम ट्रेनरचा सल्ला घेतला तर योग्यच! मात्र मनाला वाटेल तो व्यायाम, वाटेल तेवढा आणि जमेल त्या वेळेत करत असाल तर ते आरोग्यासाठी घातक आहे.
टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर रुग्णालय हृदयविकार विभागाचे प्रा. आणि प्रमुख डॉ. अजय चौरसिया म्हणाले की, सध्या प्रत्येक जण फिट राहण्यासाठी अनेक युक्त्या लढवत आहेत. त्यात मोबाइल फिटनेस अॅपचं जाळं वाढत असल्याने अनेक जण या अॅपकडे आकर्षित होताना दिसत आहेत, परंतु पहिल्यांदा व्यायाम सुरू करताना शारीरिकरीत्या फिट असणं खूप गरजेचं आहे. यासाठी जिम लावण्यासाठी प्रत्येकानं उच्च रक्तदाब, उच्च कॉलेस्टेरॉल, सीटी स्पॅन अँजिओग्राफी, ईसीजी आणि एमआरआय चाचणी करून घेणं खूप गरजेचं आहे. काहींना काwटुंबिक इतिहास असल्याचं हे वैद्यकीय चाचणीनंतरच कळू शकतं. मोबाइल अॅपद्वारे व्यायाम करताना या गोष्टी पाहिल्या जात नाहीत. त्यामुळे योग्य पद्धतीने व्यायाम न झाल्यास हृदयविकारचा झटका येऊ शकतो. सध्या हृदयविकाराचा सर्वाधिक झटका हा 30 वर्षांखालील तरुणांमध्ये अधिक दिसून येत आहे. व्यायाम करताना प्रशिक्षित व्यक्तीचा सल्ला घ्यावा. व्यायामाआधी वॉर्मअप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही तुमच्या वर्कआऊटच्या क्षमतेबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे. दुसऱयाच्या म्हणण्यानुसार व्यायाम कधीही वाढवू नये. कारण त्यामुळे अनेकदा समस्या निर्माण होतात सर्व नियमावलीचं पालन करून व्यायामाला केल्यास पुढील 20 वर्षांत हृदयविकारामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण 60-70 टक्के कमी होऊ शकते.
झायनोवा शाल्बी रुग्णालयातील हृदयविकार तज्ञ डॉ. मुकेश पारीख म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला फिट राहायचं आहे. त्यासाठी अनेक लोक मोबाइल फिटनेस अॅपचा वापर करतात. कुठल्याही प्रकारचा व्यायाम करताना आपल्या शरीराचे पोस्चर योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यात स्नायूंना इजा होऊ शकते. त्यामुळे फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करावा.
























































