विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली निवृत्तीची घोषणा करणार, क्रिकेटपटूच्या दाव्याने खळबळ

हिंदुस्थानचा तडाखेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली हा विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा करणार असा दावा एका क्रिकेटपटूने केला आहे. या दाव्यामुळे क्रिकेटजगतात चर्चांना उधाण आलं आहे.

हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स. डिव्हिलियर्स हा विराटचा जवळचा मित्र मानला जातो. त्याच्या दाव्यानुसार, जर विराटने 2023च्या विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा केली, तर त्यात काहीही आश्चर्य वाटायला नको. हिंदुस्थानने जर हा विश्वचषक जिंकला तर कोहली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निश्चितच विचार करेल. मला माहीत आहे की त्याला यापुढचा 2027चा विश्वचषक खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला यायला आवडेल. पण, हे सांगणं थोडं कठीण आहे की विराट पुढच्या विश्वचषकात संघात सहभागी असेल, असं डिव्हिलियर्स म्हणाला आहे.

विराट कोहली याबाबत तुम्हाला माहिती देईलच. पण, मला वाटतं की जर त्याने विश्वचषक जिंकला तर निवृत्ती स्वीकारण्यासाठी ही योग्य वेळ ठरेल. कदाचित तो पुढील काही वर्षं कसोटी आणि आयपीएल खेळेल, असा अंदाजही एबी डिव्हिलियर्सने वर्तवला आहे.