
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा चित्रिकरणादरम्यान दुखापत झाली असून त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याची माहिती स्वत: अभिषेक बच्चन याने दिली असून दुखापत झालेल्या हातासह एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
गेल्या बुधवारी चेन्नईमध्ये आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करताना सेटवर दुर्घटना झाली. यात माध्या उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. हात पूर्ववत करण्यासाठी मला शस्त्रक्रिया करावी लागली. यासाठी मुंबईतील घरी यावे लागले असून शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे पुन्हा चेन्नईमध्ये चित्रिकरणासाठी आलो आहे. म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन, अशी पोस्ट अभिषेक बच्चन याने केली आहे.
तसेच माझे वडील म्हणतात ‘मर्द को दर्द नही होता’, पण थोड्या वेदना तर होतातच. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि मी लवकर बरा व्हावा यासाठी पाठवलेल्या मेसेजसाठी सर्वांचे धन्यवाद, असेही अभिषेक बच्चन याने आपल्या पोस्टच्या अखेरीस म्हटले.
दरम्यान, अभिषेक बच्चन याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातावर प्लास्टर दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता बॉबी देओल याने आशा आहे तू लवकरच बरा होईल, असे म्हटले. तसेच जेनेलिया डिसूजा-देशमुख, रितेश देशमुख, मनिष मल्होत्रा, सोनाली बेंद्रे, झोया अख्तर, करण जोहर यांनीही लवकर बरा होण्याची प्रार्थना केली.

























































