
संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दही, दूध, मध, साखर आणि तूप आदी पंचामृताचा अभिषेक घालून पवित्र स्थळाचे शुद्धीकरण केले. मंदिर उघडा आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी चपला व बूट घालून या समाधीस्थळावर धुडगूस घातला होता.
राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपने नुकतेच राज्यभर शंखनाद आंदोलन केले. पंढरपूर येथेही श्री विठ्ठल मंदिराजवळ हे आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने संत नामदेव पायरीवर नतमस्तक होतात त्या पवित्र ठिकाणावर भाजप कार्यकर्ते पायात चप्पल, बूट घालून चढले. या पवित्र स्थळावर धुडगूस घालत विटंबना केली होती. या कृतीमुळे वारकरी संप्रदाय व पंढरपूरकरांमध्ये संतापाची भावना पसरली होती.
भाजपने संत नामदेव पायरीचे पावित्र्य भंग केले म्हणून कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नामदेव पायरीचे शुद्धीकरण करण्यात आले. श्री संत नामदेव महाराज पायरी आणि मंदिर परिसराचे गोमुत्र आणि पंचामृताने शुद्धीकरण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी आणि आमदारांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभाग व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
























































