हातपंप दुरुस्ती करणाऱ्या वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

हातपंप दुरुस्ती करणार्‍या गाडीने पाच वर्षाच्या अनुजा शिवाजी कोल्हे (रा. राजुरी, ता. जामखेड) या चिमुरडीला रस्ता ओलांडताना धडक दिली. या धडकेत चिमुकलीचा जागीच च मृत्यू झाल्याने राजुरी परीसरात शोककळा पसरली आहे. तालुक्यातील राजुरी हे गाव शिर्डी हैदराबाद महामार्गावर जामखेड पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. अनुजा दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी भरधाव वेगाने जामखेडकडे जात होती. त्या वाहनाची अनुजाला धडक बसली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक घाबरून पळून गेला. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर रात्री उशिरा राजुरी कोल्हेवस्तीवर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सध्या पंचायत समितीमध्ये हातपंप दुरुस्तीच्या गाड्यांवर ठेकेदार पद्धतीने चालकाची भरती केली आहे. चालकाकडे हेवी लायसन्स लागते. परंतु ठेकेदार आपल्या मर्जीतील लोकांची भरती करतात. तसेच रविवारी सुट्टी असताना गाडी बाहेर गेली कशी अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. तसेच चालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करवा अशी मागणी अनुजाच्या नातेवाईकांनी केली आहे. चिमुरडीला पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती करणार्‍या गाडीने धडक दिली असतानाही एकही पंचायत समितीचा अधिकारी किंवा पदाधिकारी फिरकला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.