शाळकरी बसला अपघात, ४ जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, राहाता

विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन चाललेल्या गाडीचा पाठा तुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला आदळून पलटी झाली. ही घटना राहाता तालुक्यातील वाकडी येथे शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यात ११ जण किरकोळ जखमी तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे.

वाकडी गणेशनगर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलची बस (एम.एच.१७ एजी ७३९८) पिंप्री निर्मळ, अस्तागाव, चोळकेवाडी, वाकडी या मार्गावरील विद्यार्थी घेऊन शाळेत जात असताना वाकडी गणेशनगर रोडवर हॉटेल गारवाजवळ बसचा पाठा तुटल्याने बस बाजूच्या गटारावरून उडी घेत विजेच्या खांबाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. यावेळी बसमध्ये २९ विद्यार्थी होते अपघातानंतर विजेचा खांब व विद्युत वाहक तारा बसवर पडल्या होत्या. विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील रहिवासी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडत बसमधील विद्यार्थी व शिक्षकांना बाहेर काढले.

जखमींना वाकडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अ‍ॅम्ब्युलन्सने उपचारासाठी हलवण्यात आले. यात प्रतिक्षा चोळके, वैभव लोंढे, आरुषी पठारे, रितेश चोळके, कुष्णा चोळके, कुष्णा येलम, गोकुळ चोळके, स्रुतम शेळके हे विद्यार्थी तर निलम लाल, स्वाती वाणी या शिक्षिका, चालक शंकर जाधव किरकोळ जखमी झाले आहे. सुरेखा लोंढे, प्रफुल्ल काळे, संस्कार शेळके, अर्थव चोळके चार विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सेंट लुक हॉस्पिटल श्रीरामपूर येथे उपचार सुरू आहेत.

किरकोळ जखमी विद्यार्थ्याना प्राथमिक उपचार करून लगेच नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. अचानक हा प्रकार घडल्याने विद्यार्थी घाबरून गेले होते. वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत उपचार चालू केले. अपघाताची श्रीरामपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.