भोकरदन-जाफराबाद रस्त्यावर अपघात; दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील म्हसरुळ फाट्याजवळील जिनिंगसमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मोटरसायकल धडकुन पिता-पुत्र जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये शंकर भागचंद महेर (35), रोहन शंकर महेर (10) हे दोन पिता-पुत्रांचा समावेश आहे. तर पत्नी ममता शंकर महेर (वय 32) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपुर येथील शंकर भागचंद महेर पत्नी आणि मुलासह जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे त्यांच्या बहीणीला भेटण्यासाठी जात होते. भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील म्हसरुळ फाट्याजवळील जिनिंगसमोर रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागुन त्यांच्या मोटरसायकलने धडक दिली. यात शंकर महेर आणि मुलगा रोहन हे दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी ममता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी आहेत.

स्थानिकांनी तातडीने तिघांना रुग्णालयात दाखल केले. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यावर पिता-पुत्रांना मृत घोषित केले. तर पत्नीला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी जाफराबाद पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पंचनामा केला. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.