खातेदारांनी न्यायालय, आरबीआयवर दबाव टाकू नये! हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले

482
mumbai bombay-highcourt

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आरबीआयला दोषी ठरवणार्‍या खातेदारांना हायकोर्टाने बुधवारी खडसावले. आरबीआयने या प्रकरणात वेळीच लक्ष घातल्यामुळे खातेधारकांचे होणारे नुकसान टळले आहे. रिझर्व्ह बँकेनेच खातेदारांचे पैसे बुडवले हा याचिकाकर्त्यांचा आरोप चुकीचा असून हे आरोप न पटण्यासारखेच आहेत. त्यामुळे खातेदारांनी यापुढे न्यायालय आणि आरबीआयवर दबाव टाकू नये अशा शब्दांत हायकोर्टाने खातेधारकांना सुनावले.

आर्थिक घोटाळ्यामुळे आरबीआयने पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदारांना आपल्या खात्यातून हवी तेवढी रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. याशिवाय पीएनबी बँकेच्या घोटाळ्यामुळे आतापर्यंत चार खातेदारांचा मृत्यूही झाला आहे. आरबीआयने पीएनबी बँकेवर घातलेले निर्बंध हटवावेत तसेच ग्राहकांना आपल्या खात्यातून जास्तीत जास्त रक्कम काढण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी करत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्यासह इतर काही जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. कोर्टाने समिती स्थापन करून कर्जबुडव्या एचडीआयएलकडून जप्त केलेल्या मालमत्तेचा लवकरात लवकर लिलाव करून खातेधारकांचे पैसे परत करावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी आज हायकोर्टात केली. हायकोर्टाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.

आरबीआय गुरूवारी बाजू मांडणार

बुधवारी पार पडलेल्या सुनावणी वेळी याचिकाकर्त्यांनी आरबीआयवर आक्षेप घेत या प्रकरणात रिझर्व्ह बँकच दोषी असल्याचे कोर्टाला सांगितले. दरम्यान, गुरुवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठासमोर होणार्‍या सुनावणीत आरबीआय आपली बाजू मांडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या