पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीस संभाजीनगर जिल्ह्यातून अटक

मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला रामाचारी बिस्कुट पवार याला संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथून अटक करण्यात आली. लातूर जिल्ह्यात त्याच्या विरुद्ध सहा गुन्हे दाखल झालेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे सन 2021 मध्ये दाखल असलेल्या मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यात आरोपी रामाचारी बिस्कुट पवारला अटक करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मालमत्ता चोरी गुन्ह्यात तो पाहिजे होता. रामाचारी पवार अटकेमध्ये असताना गांधीचौक पोलीस ठाण्याच्या लॉकअप मधून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. परंतु तो हाताला लागत नव्हता. कोठडीतून पळून गेल्याने त्याच्यावर पोलीस ठाणे गांधीचौक येथे पोलीस कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

23 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस पथक संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन या ठिकाणी पोहोचून बिडकीन गावातील रामनगर परिसरातील आरोपीच्या चुलत सासऱ्याच्या घरातून रामाचारी उर्फ राजवीर बिस्कुट उर्फ भीमंना उर्फ शंकर पवार, वय 22 वर्ष, राहणार कवठारोड, वसमत जिल्हा हिंगोली. हल्ली मुक्काम बिडकीन यास अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. रामाचारी बिस्कुट पवार यास पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे गांधीचौक यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, जमीर शेख , नकुल पाटील यांनी पार पाडली आहे.