गळफास घेण्याची धमकी देत चित्रपट निर्माता झाडावर चढला, छत्रपती शिवाजी महाराज पार्कात गोंधळ

मुंबईतील दादर भागात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात बुधवारी सकाळी खळबळजनक प्रकार घडला. एका चित्रपट निर्मात्याने थेट झाडावर चढत गळफास घेण्याची धमकी दिली. यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे येथे पुरता गोंधळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून (एडब्ल्यूबीआय) सुरू असलेल्या जाचक वसुलीच्या विरोधात चित्रपट निर्माते प्रविणकुमार मोहरे यांनी हे आंदोलन केले आहे. सकाळच्या सुमारास ते झाडावर चढले आमि आपली सुटका करण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास गळफास घेऊ अशी धमकी दिली. याची माहिती मिळताच पोली, अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

प्रविणकुमार मोहरे यांनी आपल्यासोबत एक बॅनरही झळकावले आहे. अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून (एडब्ल्यूबीआय) सुरू असलेल्या जाचक वसुलीच्या आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी येथे पोहोचलेल्या अग्निशमन दलाने त्यांना खाली येण्याची गळ घातली. मात्र ते ऐकण्याची मनस्थितीत नव्हते. अखेर जवानांनी त्यांची कशीबशी सुटका केली आणि त्यांना खाली उतरवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

चित्रपटामध्ये प्राण्यांचा वापर करायचा असल्यास एडब्ल्यूबीआयला 30 हजार रुपये शुल्क द्यावे लागते. त्यानंतर त्यांच्याकडून ना-हरक प्रमाणपत्र मिळते. जर हे शुल्क भरले नाही तर संबंधित दृष्य चित्रपटातून वगळावे लागते. याचा अर्थ 30 हजार रुपये भरले तर चित्रिकरणादरम्यान प्राण्यांसोबत होणारा कथित अन्याय थांबणार का? असा सवाल प्रविणकुमार मोहरे यांनी उपस्थित केला.

एडब्ल्यूबीआयवर गंभीर आरोप

ते पुढे म्हणाले की, आमचा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यात पाळीव प्राण्यावर दृष्ये चित्रित करण्यात आलेली आहेत. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळत नसल्याने चित्रपट प्रदर्शित कसा करायचा असा सवाल आमच्यासमोर आहे. जनावरांच्या बेकायदेशीरपणे कत्तली रोखण्याऐवजी एडब्ल्यूबीआय निर्मात्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.