नाट्यगृहात नो ट्रिंग ट्रिंग प्लीज!

सामना ऑनलाईन । मुंबई

नाटकाचा प्रयोग सुरू असताना मध्येच प्रेक्षकांचे मोबाईल वाजतात आणि नाटकात व्यत्यय येतो. काही प्रेक्षकांच्या बेशिस्तपणाचा त्रास कलाकारांसोबत सहप्रेक्षकांनाही बसतो. याविरोधात कलाकार वर्षानुवर्षे नाराजी व्यक्त करीत आहेत. मात्र सुमित राघवन याने मोबाईलच्या त्रासाला कंटाळून नाटक बंद केल्याच्या ताज्या घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक कलाकार आणि प्रेक्षक ‘आय स्टॅण्ड बाय सुमित राघवन’ म्हणत या चळवळीला पाठिंबा देत असून थिएटरमध्ये नो ट्रिंग ट्रिंगचे आवाहन करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये  ‘नॉक नॉक सेलिब्रेटी’ नाटक सुरू असताना काही प्रेक्षकांचे मोबाईल वाजले, तसेच इतरही व्यत्यय आल्यामुळे सुमित राघवनने नाटक थांबवल्याची घटना नुकतीच घडली. यानंतर सुमितने केलेली कृती योग्य की अयोग्य याची चर्चा होऊ लागली आहे.  सुमितने नाटक थांबवण्याचे कारण देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी सुमितला पाठिंबा दिला आहे. ‘आय स्टॅण्ड बाय सुमित राघवन’ या हॅशटॅगने चळवळ सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत अनेकांनी सुमितची पोस्ट शेअर करून चळवळीला बळ दिले आहे. सुनील सुकथनकर, शीतल शुक्ल, विजय पाटकर, शुभांगी गोखले, अतुल परचुरे, सचित पाटील, सुव्रत जोशी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

जितेंद्र जोशी म्हणतोय, मोबाईलचं बघा बुवा… अवघड आहे!

‘आय स्टॅण्ड बाय सुमित राघवन’ या चळवळीला पाठिंबा देत अभिनेता जितेंद्र जोशी यांनी आज एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये मोबाईलचं बघा बुवा… अवघड आहे. फार त्रास होतो, अशा शब्दांत नतद्रष्ट प्रेक्षकांची कानउघाडणी केली आहे. प्रेक्षक दूरवरून, अगदी लोकलचा प्रवास करून नाटकाला येतात. रांगेत उभं राहून तिकीट काढतात, एडव्हान्स बुकिंग करतात, नाटकावर इतकं प्रेम करता मग दोन-तीन सेकंदांत मोबाईल सायलंट करू शकत नाही का, असा सवाल जितेंद्र जोशीने केला आहे. ‘कितीही गोंधळ असला तरी डोंबारी आपला खेळ करतोच ना, मग तुम्ही नाटक का करू शकत नाही’ किंवा ‘प्रेक्षकांच्या जिवावर मोठे होता,’ असा अनाठायी युक्तिवाद करणाऱ्या प्रेक्षकांचाही त्याने व्हिडीओतून समाचार घेतला आहे. कलाकार स्वतःच्या जिवावर मोठा होतो, असे जितेंद्रने म्हटले असून प्रेक्षक ऑलवेज भारीच. बालगंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणायचे, बालगंधर्व खूप टॅलेंटेड होते, आम्ही सामान्य कलाकार आहोत. आम्हाला त्रास होतो, असे मत त्याने व्यक्त केले आहे.