
कश्मीरमधील 23 वर्षीय सायकलपटू आदिल तेली याने इतिहास रचला आहे. त्याने कश्मीर ते कन्याकुमारी हे 3600 किमीचे अंतर केवळ 8 दिवसांत पार केले आहे. त्याच्या या पराक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आठ दिवस 1 तास आणि 37 मिनिटांत त्याने हे अंतर कापले आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजन या सायकलपटूच्या नावावर होता. त्याने 8 दिवस 7 तास आणि 37 मिनिटांत हे अंतर पार केले होते.
नारबल येथे राहणाऱया आदिलने 22 मार्चला सकाळी 7.30 वाजता श्रीनगर येथील घंटाघर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली होती. 30 मार्चला सकाळी नऊच्या सुमारास तो कन्याकुमारीला पोहोचला. सायकल प्रवासाला सुरुवात करताच पहिल्याच दिवशी त्याने श्रीनगर ते लेह हे 440 किमीचे अंतर पार केले होते.
कश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासात त्याने दिल्ली, आग्रा, ग्वालियर, हैद्राबाद, मदुराई अशा महत्त्वाच्या शहरांतून प्रवास केला. प्रवासात त्याच्यासोबत फिजिओथेरपीस्ट, न्युट्रिशनिस्ट, मेकॅनिक अशी आठ जणांची टिम होती. या अनोख्या मिशनसाठी आदिलने अमृतसर येथील गुरुनानक देव युनिव्हर्सिटीत जाऊन पाच महिन्यांचे ट्रेनिंग घेतले होते. 2019 साली आदिलने श्रीनगर ते लेह हे अंतर 26 तास 30 मिनिटांत पार करून इतिहास रचला होता.

























































