
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून निवडणूक लढवावी किंवा मी ठाण्यातून निवडणूक लढवतो, होऊन जाऊ दे, असे आव्हान पुन्हा एकदा शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना माध्यमांनी विचारला. त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आपली भूमिका स्पष्ट केली.
अधिवेशनात सगळी थट्टा चाललीय
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरही यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोट ठेवले. ते म्हणाले की, अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येत आहेत, पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर राहत आहेत. अधिवेशनात कुठलेही विषय गांभीर्याने घेतले जात नाहीत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना इतर राज्यांत हाजीर राहा ,असे आदेश आल्याने ते राजस्थानला गेले आहेत. मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयावर काल चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणीही हजर नव्हते, अशी सगळी थट्टा सुरू आहे.
राज्यातील कामे प्रलंबित आणि मुख्यमंत्री राजस्थानात!
काम पूर्ण होऊन आठ महिने झाले तरी ‘दिघा स्टेशनचे उद्घाटन झालेले नाही. अनेक कामे प्रलंबित असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे आहेत, तर राजस्थानमध्ये. राज्यात अडीच हजार शेतकऱयांनी आत्महत्या केली. शेतकऱयांचे प्रश्न मोठे आहेत. राज्यातले उद्योग बाहेरील राज्यात जात आहेत, मात्र मुख्यमंत्री वेगळ्याच कामात लागले आहेत,’, असेही टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडले.
एआयच्या वापराबाबत महाराष्ट्राने कायदा बनवावा!
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्ससंदर्भात युरोपीयन युनियनने कायदा बनवला तसा कायदा पेंद्रात बनवण्यावर विचार करत आहे. तो महत्त्वाचा मुद्दा आपण सभागृहात मांडला. एआय हे जनहितासाठी वापरले गेलेच पाहिजे. आरोग्य, शिक्षणासाठी एआय महत्त्वाचे आहे. पण एआयमुळे गुन्हे वाढू नयेत, असे आपण सांगितले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात पेंद्र सरकार कायदा बनवत असल्याचे सांगितले. तिथून जर उशीर झाला तर महाराष्ट्रात तो बनवावा असा मुद्दा आपण मांडला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जखम मांडीला, मलम शेंडीला!
बोरिवली-विरार रेल्वेसाठी कांदळवने हलवण्याच्या सरकारच्या प्रयत्नावरही आदित्य ठाकरे यांनी यावेळी टीका केली. ‘बोरिवली-विरार या रेल्वेसाठी काही कांदळवने हलवायचा प्रयत्न होत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलवणार असल्याची माहिती आहे. हे तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असा टोला त्यांनी लगावला. जिथली झाडे आहेत तिथेच जवळपास लावली पाहिजेत. विरारमधली झाडे तोडायची आणि गडचिरोलीला लावायची हा कुठला न्याय, असा सवालही त्यांनी केला.
























































