
रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असतानाच दरडग्रस्त भागातील तब्बल 310 जणांना खबरदारी म्हणून स्थलांतरित होण्याच्या नोटीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यातील 20 कुटुंबातील 102 जणांचे खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतर करण्यात आले आहे.
त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील पांगरी गावातील एका कुटुंबातील 5 सदस्यांचे स्वतःच्या घराशेजारील गोठ्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. माभळे येथील कसबा संगमेश्वर पारकर वाडा येथील 12 कुटुंबांतील 40 जणांचे स्थलांतर त्यांचे नातेवाईक आणि कुणबी भवन येथे करण्यात आले आहे. तर अजून 36 जणांना स्थलांतरित होण्याची नोटीस स्थानिक प्रशासनाने बजावली आहे. मुर्शी साखरपा येथील 14 कुटुंबातील 57 जणांचं स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांच्या घरी करण्यात आले आहे. तर अजून 6 जणांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस याठिकाणी बजविण्यात आल्या आहेत.
याशिवाय अंगावली येथील ओझरे खुर्दच्या 39 जणांना, फणसवणे येथील तिवरे घेरा प्रचित गड नायरी येथे तर माखजन येथील 53 जणांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आंबेड खुर्द कडवई येथील एकाला स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तेर्ये येथील कुळे, देवळे, घेरा प्रचित गड, शिवणे, काटवली येथील 56 जणांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. फुणगूस येथील डिंगणी कुरण येथील 17 जणांना स्थलांतरित होण्याची नोटीस जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बजावण्यात आली आहे . मुसळधार पावसामुळे नदीकिनारी तसेच डोंगरा जवळ राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
























































