
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये चिनी हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अलिशान हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये अनेक चिनी नागरिक अडकल्याची भीती आहे. दरम्यान हॉटेलवरील हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये हॉटेलच्या एका भागात आग लागल्याचे दिसत आहे. तसेच अधूनमधून गोळीबाराचा आवाज येत आहे.
हॉटेलवरील या दहशतवादी हल्ल्याबाबात अद्याप तालिबान सरकार किंवा चीनच्या दूतावासाने कोणतीही माहिती दिलेली नाही. हॉटेलमध्ये काही आत्मघातकी हल्लेखोर असल्याचे काही वृत्तवाहिनी वृत्त दिले आहे. सध्या तालिबानच्या सुरक्षा दलांना आत जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
चीनच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीचे ठिकाण
चीनचे अनेक राजकीय व प्रशासकीय अधिकारी या हॉटेलमध्ये येतात. त्यांच्या बैठकांचे प्रमुख ठिकाण म्हणूनही या हॉटेलकडे पाहिले जाते. चीनच्या राजदूताने शुक्रवारी तालिबान अधिकाऱयांशी काबूलमधील आपल्या दूतावासाच्या सुरक्षेबाबत चर्चा केली होती. त्यानंतर सदरचा हल्ला झाला आहे. दोन आठवडय़ांपूर्वी याच भागात पाकिस्तानच्या दूतावासावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एक पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी जखमी झाला होता.


























































