
इंद्रायणी नार्वेकर-करंबे । मुंबई
सध्या सोशल मीडियावर टेनइयर्स चॅलेंजचा धुमाकूळ सुरू आहे. पालिकेने आतापर्यंत स्थित्यंतराची अशी अनेक चॅलेंजेस पूर्ण केली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फ्लोरा फाऊंटन या ऐतिहासिक कारंजाचे जतन करण्याचे काम होते. अनेक अडथळे पार करीत गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेले हे काम आता पूर्ण झाले असून तब्बल 12 वर्षांनी या कारंजातून पाण्याचे फवारे निघणार आहेत. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 24 जानेवारीला या फाऊंटनचे लोकार्पण होणार आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव हुतात्मा चौकात पडदानशीन असलेले फ्लोरा फाऊंटन लवकरच मुंबईकरांना आणि पर्यटकांना पाहता येणार आहे. शिल्पकलेचा आणि वॉटर इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असलेले हे फाऊंटनच जतन करण्याचे अवघड चॅलेंज पालिकेने पूर्ण केले आहे. या कारंजाच्या ब्रिटिश इंजिनीअरिंगने पालिकेच्या अभियंत्यांना अक्षरशः घाम फोडला होता. कारंजांच्या पाइपचे कनेक्शन शोधताना अभियंत्यांच्या नाकीनऊ आले होते. दगडाच्या आत कन्सिल केलेल्या पाण्याच्या वाहिन्या शोधण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा अवधी लागल्यामुळे दुरुस्तीचे काम लांबले होते. आता हे काम आणि अवतीभवतीचे सुशोभीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. लोकार्पणानंतर फ्लोरा फाऊंटनच्या अवतीभवती बसून पर्यटकांना या कारंजाचा अनुभव घेता येणार आहे.
असे पूर्ण केले चॅलेंज
सन 1864 मध्ये तयार करण्यात आलेल्या फ्लोरा फाऊंटनची गेल्या काही काळात अक्षरशः दुर्दशा झाली होती. त्यामुळे दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले होते. यूकेमधील पोर्टलॅण्ड स्टोन या विशिष्ट दगडात बनवलेल्या या शिल्पाकृतीचे काही अवयव तुटले होते. तुटलेले हात आणि नाक जोडण्यासाठी पोर्टलॅण्ड स्टोनशी मिळताजुळता पोरबंदर स्टोन वापरून शिल्पाकृती जतन करण्यात आल्या आहेत. शिल्पाकृतीची स्वच्छता आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सभोवताली पर्यटकांना उभे राहता येईल किंवा बसता येईल अशी गोलाकार जागा तयार करण्यात आली आहे. तर गरम वाफेच्या मशीनने या शिल्पाकृतीवरील रंगांचे थर काढण्यात आले आहेत.
12 इअर्स चॅलेंज पूर्ण
फ्लोरा फाऊंटन ही मुंबईची ओळख आहे. तीन लेअरच्या या कारंजामध्ये दोन्ही बाजूंना असलेले सिंह आणि डॉल्फिन यांच्या तोंडातून पाणी खाली पडत असे. या कारंजामधून सन 2007 पर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. त्यानंतर हे कारंजे बिघडले व त्यातून पाणी यायचे बंद झाले. महत्प्रयासाने आता हे कारंजे र्प्वूवत करण्यात आले आहे. याच्या सर्व छिद्रांमधून पाणी पडू लागले आहे. – किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ए वॉर्ड




























































