संध्याकाळी 7 नंतर विचार करायला लागतो कोणत्या हॉटेलमध्ये जायचे आहे!

आज तकने आयोजित केलेल्या अजेंडा आज तक 2022 या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मजेशीर उत्तरे दिली. शुक्रवारी अजेंडा आज तकमध्ये त्यांनी दिल्लीच्या प्रदूषणाविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. यादरम्यान त्यांनी स्वतःच्या तब्येतीवरही चर्चा केली. आपल्या खाण्याच्या सवयी न सोडता त्यांनी आपले वजन 135 किलोवरून 89 किलोपर्यंत कसे घटवले ते सांगितले.

यावेळी ते त्यांच्या तब्येतीबद्दल मोकळेपणाने बोलले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मला जेवणाची खूप आवड आहे. संध्याकाळी 7 नंतर, मी गंभीरपणे विचार करतो की, आज कोणत्या हॉटेलमध्ये जायचे आणि काय खायचे. वजन कमी केल्याबद्दल त्यांनी सांगितले की, खाण्यात कोणतीही घट झालेली नाही, परंतु जेवणाचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे. माझे वजन पूर्वी 135 किलो होते, जे आता 89 किलोवर आले आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना झाला त्यावेळेस एका महिला डॉक्टरने त्यांना प्राणायाम शिकवला. त्यामुळे आता मी सुमारे पाऊण तास प्राणायाम करते. त्यानंतर मी व्यायाम देखील करतो. यामुळे मी माझी एनर्जी वाढवली आहे. लोकांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी गडकरी यांनी दिल्लीतील प्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, दिल्लीच्या प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण हे उद्योग आणि वाहतुकीमुळे होत आहे. मला पाच वर्षांत दिल्लीचे प्रदूषण संपवायचे आहे. हिंदुस्थान प्रदूषणमुक्त करण्याचा माझा संकल्प आहे असे त्यांनी म्हटले.

यावेळी लवकरच बायो-बिटुमेन तयार करण्यासाठी एक प्लांट सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे बायो बिटुमेन शेतकरीच तयार करतील आणि सरकार ते शेतकऱ्यांकडून विकत घेईल. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कृषी क्षेत्रात क्रांती होईल, असे त्यांची म्हणणे आहे. तसेच बायो-सीएनजी तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.