
लांजा-झापडे- कांटे-कोटमार्गे पावस रस्त्यावरील बेनी मार्गावर त्वरीत पूल मंजूर करावा, या मागणीसाठी शांताराम उर्फ आबा सुर्वे यांनी आज महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडले.
काळबादेवी येथील अनधिकृत बांधकाम तोडण्यासंदर्भात तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची तहसीलदारांनी पायमल्ली केल्याची तक्रार करत काळबादेवी येथील शैलेंद्र मयेकर यांनी उपोषण छेडले. खेड येथील जयंत घोसाळकर यांनी वडिलांचा संशयास्पद मृत्यूचा तपास, डंपर अंगावर घालणाऱ्यावर कारवाई करा आणि अन्य काही मागण्यांसाठी आज आंदोलन छेडले. राजापुरातील रस्त्यांच्या साईडपट्टीवर गटार लाईनवर महानेट प्रकल्पाच्या कंपनी आणि ठेकेदारांनी चुकीच्या पध्दतीने पोल टाकले आहेत. ते 1056 पोल काढून टाकावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता समीर शिरवडकर यांनी करत आज आंदोलन छेडले. या आंदोलनात पिंट्या कोठारकर आणि स्वाती हडकर यांनी सहभाग घेतला.
कुडप ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग चिपळूण यांच्या मार्फत बनविण्यात आलेल्या बिबिवीचा कातळ ते देवशेत वाडी या नावाचा रस्ता कुठलेही शासकीय पुरावे न दिल्यामुळे या अनधिकृत रस्त्याला कायमस्वरूपी स्थगिती व ग्रामपंचायतीमध्ये 26 नंबरची बेकायदेशीर असलेली रस्त्याची नोंद रद्द न केल्यामुळे कुडप येथील नितीश शिर्के यांनी आमरण उपोषण छेडले.
लांजा तालुक्यातील पश्चिम विभागासाठी हा पूल झाल्यास बाराही महिने दळणवळणाची सोय होणार आहे. त्यामुळे हा पूल मंजूर करावा, अशी मागणी आबा सुर्वे यांनी केली. यावेळी राजापूर-लांजा तालुका संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, सरपंच विनया कुष्टे, अभिजीत राजाध्यक्ष, गोविंद गोखले, महेश करंबळे, मोहन डिके, मिलिंद कोटकर उपस्थित होते.
























































