
पारनेर तालुक्यात सर्वदूर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. तब्बल 10 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेले वाटाण्याचे पीक हातचे गेले आहे. वाटाण्याचे बियाणे, खते, औषधे यांसह पेरणीचा खर्च असे शेतकऱ्यांचे सुमारे 25 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतर पिकांचेही नुकसान झाले असून, तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे.
मान्सूनपूर्व पावसाने सुरुवातीला तालुक्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, त्यानंतर मृग नक्षत्राने साथ दिली. तालुक्यात सर्वत्र रोहिणी व मृग नक्षत्रात पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील वाटाणा, मूग, बाजरी, सोयाबिन, मका व इतर चारापिकाची मोठय़ा प्रमाणावर पेरणी झाली. त्यानंतर ठराविक अंतराने पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त पाऊस झाल्याने वाटाण्यासह इतर पिकांची वाढही चांगली झाली. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे फुले आलेल्या वाटाण्याच्या पिकावर मावा आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. वाटाण्याच्या वेलांना शेंडय़ाजवळ फुटवे फुटले आहेत. वाटाण्याचे पीक काळे पडून सडू लागले आहे.
सतत सुरू असलेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे वाटाणा व इतर पिकांवर मावा, बुरशीसह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे कीटकनाशकांची फवारणी करणे शक्य नाही. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वेगाने झाला आहे. परिणामी पिके धोक्यात आली आहेत.
पारनेर, पुरंदर तालुक्यांना फटका
गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यात विशेषतः पठार भागात मोठय़ा प्रमाणावर वाटाण्याची पेरणी करण्यात येते. राज्यातील पारनेर (नगर) व पुरंदर (पुणे) या तालुक्यातील वाटाण्याला पुणे, मुंबई, नाशिक येथील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. भावही चांगला मिळतो. त्यामुळे केवळ दीड महिन्यात येणाऱया या पिकाकडे शेतकरी मोठय़ा प्रमाणावर वळले आहेत. यावर्षी निसर्गाची अवकृपा झाल्याने वाटाणा उत्पादक हवालदिल झाले आहेत.



























































