अहमदपूर शहरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा, 86 दुकाने पालिकेने हटविले

नगरपालिकेच्या वतीने चोरटांगी येथे जवळपास 30 वर्षापूर्वी येथील जागेत नगरपालिकेच्या भाडे तत्वावर करार करून माजी आमदार भगवानराव नागरगोजे यांनी बारा बलुतेदार यांना आपले वेगवेगळे व्यवसाय करून आपापली उपजिवीका व उदरनिर्वाह करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार सर्व व्यावसायिक नगरपालिकेचे भाडे भरून आपआपला व्यवसाय करून आपापली उपजिवीका व उदरनिर्वाह चालवत होते. ही अतिक्रमणे पालिकेने हटवली.

शहरातील बसस्थानकासमोरील अतिक्रमण केलेल्या व्यापार्‍यांना 30 वर्षापूर्वी बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढून त्या व्यापार्‍यांना चोरटांगी येथील मोकळ्या जागेत पालिकेने दुकानांसाठी जागा दिली होती. या ठिकाणी जवळपास 86 दुकानधारक आपला व्यवसाय करत होते. चोरटांगी येथील या जागेवर पालिकेकडून व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याचे कारण पुढे करून शहरातील 30 वर्षापूर्वीपासून व्यवसाय करणार्‍या दुकानदारांना नोटीस देऊन जवळपास 86 दुकाने पालिकेकडून रविवारी हटविण्यात आली. दरम्यान येथील व्यापार्‍यांनी कायमस्वरूपी जागेची मागणी केली आहे.

चोरटांगी रोड वरील 86 दुकानदारांना वेळोवेळी नोटीसा देण्यात आल्या होत्या. या चोरटांगी रोडवरील दुकानदारांनी आपले आतिक्रमण काढून घ्यावे, असे गेल्या दोन दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीने ध्वनीक्षेपकाद्वारे शहरात फिरुन दुकानदारांना सांगण्यात येते होते. आपले अतिक्रमण तातडीने काढून घ्यावेत अन्यथा पालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात येत होते. शहरातील छोटेमोठे व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांना कायमस्वरुपी जागा नाही. शहरात विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. शहरात व्यापार्‍यांना कायमस्वरूपी जागा द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.

व्यापार्‍यांना आपली दुकाने हटविण्यासाठी अवधी दिला होता. यामुळे व्यवसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. या मोहिमेला व्यावसायिकांनी विरोध केला नसला तरी ही मोहीम सुरू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे. यासाठी अहमदपूर पोलीस तैनात करण्यात आले होते. अहमदपूर शहरातील रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. प्रमुख रस्त्यांसह इतर ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पुन्हा हे रस्ते वाहतुकीकरीता अडचणीचे ठरत आहेत. दिवसेंदिवस रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात येत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भाजी मार्केट सराफा लाईन, हिना लॉजचौक, अंबाजोगाई रोडवरील मुख्य रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. या भागातील अतिक्रमण काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची होत आहे.