
विमान प्रवास हा जितका आरामदायक, वेगवान असतो तो तितकाच धोकादायकही असतो. असाच काहीसा प्रकार अहमदाबाद-जैसलमेर दरम्यानच्या विमानप्रवासात घडला आहे. तीन वेळा लँडिंग चुकल्याने या विमानात एकच गोंधळ उडाला होता.
शनिवारी अहमदाबादहून जैसलमेरला जाण्यासाठी स्पाईसजेट या विमान कंपनीच्या विमानाने आकाशात झेप घेतली. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी हे फ्लाईट जैसलमेरच्या दिशेने झेपावलं. जवळपास 1 वाजण्याच्या सुमाराला जैसलमेर विमानतळावर ते उतरणार होतं.
विमानतळ जवळ येताच वैमानिकाने ते लँड करायचा प्रयत्न केला. पण, काही तांत्रिक कारणामुळे ते लँड होऊ शकलं नाही. तेव्हा वैमानिकाने विमान पुन्हा आकाशाच्या दिशेने नेलं. एक दोन घिरट्या घालून पुन्हा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. पण, दुसऱ्या वेळीही हा प्रयत्न फसला.
वैमानिकाने पुन्हा विमान आकाशात नेलं आणि दुसऱ्या दिशेने ते लँड करायचा प्रयत्न केला. याहीवेळी प्रयत्न यशस्वी झाला नाही. तेव्हा नाईलाजाने वैमानिकाने पुन्हा विमान उडवलं आणि ते जैसलमेर विमानतळावर आकाशात एक तासभर घिरट्या घालत राहिलं.
दरम्यान, या प्रकाराने विमानात प्रवाशांचा जीव कंठात आला होता. तीन वेळा प्रयत्न करूनही विमान उतरेनासं झाल्यावर अनेक प्रवाशांनी घाबरून देवाचा धावा सुरू केला. महिला प्रवासी रडू लागल्या. विमान लँड झालं नाही तर.. या भीतीने सगळ्यांच्याच पाचावर धारण बसली.
तीन वेळा लँडिंग अयशस्वी ठरूनही हिंमत न हरता वैमानिकाने प्रसंगावधान दाखवलं. त्याने पुन्हा ते विमान अहमदाबादच्या दिशेने वळवलं आणि उलटा प्रवास सुरू केला. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी पुन्हा ते विमान अहमदाबाद विमानतळावर उतरलं.
तिथे दुसऱ्या वैमानिकाच्या मदतीने ते पुन्हा आकाशात झेपावलं आणि त्या वैमानिकाने सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी सुरक्षित पद्धतीने जैसलमेर विमानतळावर त्याचं लँडिंग केलं. विमान जैसलमेर विमानतळाच्या जमिनीला लागताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.




























































