
नगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला तीन, तर भाजपला 2 तसेच कर्जत बाजार समितीत महाविकास आघाडी व भाजपचे समान उमेदवार विजयी झाले आहेत. काल निकाल जाहीर झालेल्या राहुरी बाजार समितीत महाविकास आघाडीप्रणित जनसेवा मंडळाचे 16 उमेदवार निवडून आले, तर विखे-कर्डिलेप्रणित विकास मंडळाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. जिल्ह्यामध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना महाविकास आघाडीने मोठा दणका दिला आहे.
श्रीगोंद्यात पाचपुते-नागवडेंच्या वर्चस्वाला सुरुंग
श्रीगोंदा – राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांना संपविण्यासाठी निघालेले भाजप आमदार बबनराव पाचपुते आणि काँग्रेसचे राजेंद्र नागवडे एकत्रित येऊन निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत राहुल जगताप यांनी पाचपुते-नागवडे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावून 11 जागांवर विजय मिळवला, तर पाचपुते-नागवडेंच्या पॅनलला सात जागा मिळाल्या.
जगताप गटाचे विजयी उमेदवार – बाबासाहेब जगताप, अजित जामदार, नितीन डुबल, दीपक पाटील-भोसले, भास्कर वागस्कर, प्रवीण ऊर्फ अतुल लोखंडे, दत्तात्रय गावडे, मनीषा मगर, अंजली रोडे, साजन पाचपुते, किसन सिदनकर. पाचपुते-नागवडे गटाचे विजयी उमेदवार – दत्तात्रय पानसरे, रोहिदास पवार, महेश दरेकर, लक्ष्मण नलगे, प्रशांत ओगले, लौकिक मेहता, आदिक वांगणे.
नगर बाजार समितीत कर्डिले-कोतकर गटाचा विजय
नगर – बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे शिवाजी कर्डिले-माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने विजय मिळवला. कर्डिले-कोतकर गटाला 18 पैकी 18 जागा मिळाल्या. माजी खासदार कै. दादा पाटील शेळके नगर बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूकप्रक्रिया झाली. कर्डिले यांच्या गटाच्या व्यापारी मतदारसंघातील दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. शनिवारी कल्याण रोडवरील अमरज्योत लॉन येथे मतमोजणी झाली. या निवडणुकीमध्ये खासदार सुजख विखे, आमदार नीलेश लंके, प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांनी लक्ष घातले होते. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. कर्डिले यांनी तब्बल 1300 मतदारांना सहलीवर पाठविले होते.
विजयी उमेदवार – राजू आंबेकर, संजय गिरवले, सुभाष निमसे, सुधीर भापकर, भाऊ भोर, मधुकर मगर, रभाजी सुळ, सुरेखा कोठुळे, मनीषा घोरपडे, आंचल सोनवणे, संतोष म्हस्के, धर्मनाथ आव्हाड, हरिभाऊ कर्डिले, भाऊसाहेब बोठे, भाऊसाहेब ठोंबे, दत्तात्रय तापकिरे, नीलेश सातपुते.
पाथर्डी बाजार समितीत सत्तांतर
पाथर्डी – आमदार मोनिका राजळेप्रणित आदिनाथ शेतकरी मंडळाने 18 पैकी 17 जागा जिकंत प्रताप ढाकणे यांच्या ताब्यातून समितीची सत्ता हिसकावून घेतली. राजळे यांच्या हमाल मापाडी मतदारसंघातील उमेदवार अशोक सावंत यांना अवघ्या दोन मताने पराभव स्वीकारावा लागला.
राजळे गटाचे विजयी उमेदवार – वैभव खलाटे, जगन्नाथ खेडकर, नानासाहेब गाडे, मधुकर देशमुख, बाळासाहेब नागरगोजे, सुभाष बर्डे, अजय रक्ताटे, सुनीता कोलते, स्मिता लाड, अरुण रायकर, जिजाबा लोंढे, शेषराव कचरे, किरण राठोड, रवींद्र आरोळे, नारायण पालवे, कुंडलिक आव्हाड, प्रशांत मंडलेचा, तर हमाल मापाडी मतदारसंघातून ढाकणे गटाचे बाबासाहेब केदार हे निवडून आले.
संगमनेरात थोरातांचेच वर्चस्व; महसूलमंत्री विखेंना भोपळा
संगमनेर – महसूलमंत्रिपद मिळाल्यापासून संगमनेरातील सत्ताकेंद्रे मिळविण्याचा राधाकृष्ण विखे-पाटील यांचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर बाजार समितीतही विखे-पाटील यांनी आक्रमकपणे लक्ष घातले. प्रचारासाठी स्वतः फिरले. मात्र, बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा जिंकून आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. थोरातांचे सर्व उमेदवार मोठय़ा मतांनी विजयी झाले, तर विखेंच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
विजयी उमेदवार – शंकर खेमनर, सुरेश कान्हेरे, सतीश खताळ, गीताराम गायकवाड, मनीष गोपाळे, कैलास पानसरे, विजय सातपुते, दीपाली वरपे, रुक्मिणी साकोरे, सुधाकर ताजणे, अनिल घुगे, मनसुख भंडारी, निसार शेख, अरुण वाघ, सखाहारी शेरमाळे, संजय खरात, नीलेश कडलग, सचिन करपे.
विखेंच्या उमेदवाराला केवळ एकच मत
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ निवडणुकीत भुईसपाट झाले. त्यांच्या पॅनलमधील सोमनाथ दिघे या उमेदवाराला अवघे एक मत पडले. यासह आणखी दोन अपक्षांना प्रत्येकी एक मत पडले, तर एका अपक्षाला शून्य मते मिळाली. शिवाय चार उमेदवारांना दहाच्या आत मते मिळाली.
पारनेरमध्ये भाजप-शिंदे गटाला धोबीपछाड
पारनेर – बाजार समितीत आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीप्रणित शेतकरी विकास मंडळाने सर्व 18 जागांवर विजय मिळवत भाजपप्रणित जनसेवा मंडळाला धोबीपछाड दिली. बाजार समिती निवडणुकीच्या इतिहासात, गेल्या 40 वर्षांत झालेल्या बिनविरोध झालेल्या दोन निवडणुका वगळता एकाच मंडळाने प्रथमच सर्व 18 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे 17 उमेदवार 200 ते 540 मतांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. खासदार डॉ. सुजय विखे यांनी उमेदवार निवडीपासून या निवडणुकीत लक्ष घातल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मतमोजणीत कुठेही चुरस दिसून आली नाही.
विजयी उमेदवार – डॉ. आबासाहेब खोडदे, प्रशांत गायकवाड, बाबासाहेब तरटे, रामदास भोसले, संदीप सालके, अशोक सावंत, किसन सुपेकर, डॉ. पद्मजा पठारे, मेघा रोकडे, गंगाराम बेलकर, बाबासाहेब नऱहे, अशोक कटारिया, चंदन भळगट, तुकाराम चव्हाण, विजय पवार, किसन रासकर, शंकर नगरे, भाऊसाहेब शिर्के.
कर्जतमध्ये पवार-शिंदेंच्या पॅनलचे प्रत्येकी नऊ उमेदवार विजयी
कर्जत – बाजार समितीत आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे या दोघांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहावयास मिळाला. आज जाहीर झालेल्या 18 जागांमध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. कर्जत बाजार समितीवर भाजपची सत्ता होती. मात्र, क्रॉस व्होटिंगचा फटका आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला बसला. यामुळे मतमोजणीसाठी आणि निकाल जाहीर करण्यासाठीही मोठा विलंब लागला.
पवार गटाचे विजयी उमेदवार – गुलाब तनपुरे, संग्राम पाटील, सुवर्णा कळसकर, हर्ष शेवाळे, राम कानगुडे, वसंत कांबळे, अमोल पाटील, प्रफुल्ल नेवसे, विजय भंडारी.
शिंदे गटाचे विजयी उमेदवार- अभय पाटील, मंगेश जगताप, काकासाहेब तापकीर, नंदाराम नवले, रामदास मांडगे, विजया गांगर्डे, लहू वतारे, बळीराम यादव, बापूसाहेब नेटके.


























































