नगर मर्चंट बँक कर्ज घोटाळा, तीन संचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी मागितली मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर मर्चंट बँकेच्या फसवणुकीच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये आज तीन संचालकांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. दरम्यान या संदर्भामध्ये संचालकांची व अधिकाऱ्यांची चौकशी उद्या सुरू राहील असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

नगर मर्चंट बँकेच्या 10 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या संदर्भामध्ये येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 2017 साठी गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या तपासात काहीच प्रगती होत नसल्याने म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी लेखी पत्र देऊन या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तपासी अधिकाऱ्यांनी बँकेच्या आजी-माजी अधिकारी व संचालकां चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. सदरचे पत्र मिळाल्यानंतर कालपासून या चौकशीला सुरुवात झाली आहे. काल चार जणांची चौकशी पोलिसांनी केली होती. यामध्ये तीन संचालकांचा समावेश होता.

आज बँकेचे संचालक आनंदराम मुनोत, अजय मुथा, संजीव गांधी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्याकडे म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी असा अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी त्यांना कागदपत्रासह जबाब देण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक आठरे यांनी उर्वरित संचालकांना आपण चौकशीसाठी बोलवले असून इतरांची चौकशी उद्या होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आजी माजी संचालकांना व अधिकाऱ्यांना यामध्ये बोलवल्यामुळे अनेक बाबी उघड होण्याचीही शक्यता आहे. तसेच या संदर्भात चौकशीमध्ये पुन्हा संचालकांचा चौकशीमध्ये समावेश आहे का नाही याबाबत सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे.