नगर शहरातील रस्ते, पाण्याचे प्रश्न तत्काळ सोडवा! आमदार सुनील शिंदे यांची नगर मनपाला सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, पाणीपुरवठय़ातही सातत्याने अडथळे येत आहेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते आणि दररोज पाणी मिळेल, यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे. प्रशासनाने माणुसकी म्हणून या प्रश्नांकडे बघून तत्काळ याबाबत मार्ग काढावा, अशा सूचना शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी प्रशासनाला दिले.

नगर शहरातील रस्त्याच्या संदर्भामध्ये दैनिक ‘सामना’तून आज वृत्त प्रकाशित झाले होते. यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे यांनी आज तत्काळ नगर महापालिकेत बैठक घेतली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त पंकज जावळे, शिवसेना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, नगर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 2017 साली निधी येऊनही कामे होत नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून नगरसेवकांना धारेवर धरले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी आलेला आहे, मग कामे का झाली नाही? शहरात सध्या ‘अमृत योजने’सह इतर कामे चालू आहेत. ती पूर्णत्वाला न गेल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ व्हावी, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी न देता तो थेट महापालिकेला दिला गेला पाहिजे. नगर शहराला आज एक किंवा दोन दिवसाआड पाणी येत आहे. आपण नियमित पाणी देऊ शकू का, या संदर्भातही प्रशासनाने तत्काळ विचार करावा, असेही ते म्हणाले.

संभाजी कदम म्हणाले, शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी आलेला आहे. मात्र, हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. प्रशासनाने याचा पाठपुरावा करावा. आयुक्त पंकज जावळे म्हणाले, शहरातील मुख्य पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र येणे बाकी आहे. आम्ही या रस्त्यांसाठी वाढीव रक्कमही देण्यास तयार आहोत, पण ते पत्र आल्यावरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाईल. शहरात ‘अमृत योजने’चे काम सध्या सुरू असून, ते 99 टक्के पूर्ण झाले आहे. केवळ पंप नसल्यामुळे इतर काम राहिले आहे, असेही ते म्हणाले.

महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, महानगरपालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बैठक घेतलेली होती. त्या संदर्भात पुढील उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला तशा कल्पना देण्यात आलेल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलून तत्काळ रस्त्यांचा विषय मार्गी लावा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.