नगर मनपाच्या अनेक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा, मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये अभ्यागतांना बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेत कार्यरत असलेल्या अनेक अधिकारी-कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झालेली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयासह सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी याबाबत कार्यालयीन आदेश काढला आहे.

नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सध्या मोठय़ा प्रमाणावर कोरोनाबाधित होऊ लागले आहेत.

त्यामुळे आयुक्त गोरे यांनी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतींसह सर्व प्रभाग कार्यालयांच्या आवारात नागरिकांना व अभ्यागतांना प्रवेशबंदी केली आहे.

दोघा कर्मचाऱयांचा मृत्यू

कोरोनाबाधित झालेल्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱयांचा रविवारी (दि.11) रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यातील एक कर्मचारी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात, तर एक कर्मचारी झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालयात कार्यरत होता. या दोन कर्मचाऱयांच्या मृत्यूमुळे कोरोनाने मृत पावलेल्या महापालिका कर्मचाऱयांची संख्या आता 9 झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून सर्व अधिकारी-कर्मचाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, तसेच कार्यालयीन कामकाज करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त गोरे यांनी केले आहे.