पर्यावरणपूरक उपाययोजनांतून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साधू, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखून शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न  करूया, असे आवाहन  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱहे यांनी आज केले.

संपर्क आणि स्त्री आधार केंद्र संस्थांमार्फत आयोजित दोनदिवसीय ‘मंथन’ परिषदेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. या परिषदेत हवामान बदल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांची सांगड घालून कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाहतूक, कचऱयाचे विलगीकरण, हरित क्षेत्र वाढविणे, प्रदूषण कमी करणे या शहरांतील समस्यांबरोबर पाणी, शेती आदी ग्रामीण भागातील समस्यांवर वातावरणीय बदलांचा परिणाम दिसून येत आहे. जल, जंगल, जमीन या क्षेत्रातील हवामान बदलांबाबत प्रत्यक्ष कृती करणाऱ्या संस्थांनी या ‘मंथन’ परिषदेत सहभागी होऊन विचारांची पेरणी केली आहे. या चर्चेतून निघालेल्या मुद्दय़ांच्या आधारे शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर

या परिषदेत उपस्थित सर्वांमार्फत ई-शपथ घेऊन पर्यावरणपूरक सवय अंगिकारली जाईल. वातावरणीय बदल ही वास्तविकता असून ती आपल्या दाराशी आली आहे आणि त्यावर आजच कृती करणे गरजेचे आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, कार्बन शोषून घेणे, रिडय़ूस, रिफ्यूज, रियूज, रिसायकल आणि रिकव्हर या पाच मुद्दय़ांचा अवलंब करून जीवनशैलीत बदल करणे, हरित क्षेत्र वाढविणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ऊर्जा, परिवहन, उद्योग, कृषी, नगरविकास आदी संबंधित विभागांच्या सहाय्याने 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.