
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारामुळे देशभरात खळबळ उडाली होती. जुबली हिल्स परिसरात झालेल्या या सामूहिक बलात्कारावरून राजकारण सुरू असतानाच आता एमआयएमच्या आमदाराच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदाराचा मुलगा अल्पवयीन असून बलात्कार प्रकारमधील तो आरोपी आहे. या बलात्कार प्रकरणातील सर्वच्या सर्व सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील पाच आरोपी अल्पवयीन आहेत.
हैदराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पाच अल्पवयीन मुलांसह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील चौघांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तसेच, आज 2 जणांची रवानगी होणार आहे.
या प्रकरणाच्या तपासणीसाठी अनेक सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते. कलम 164 अंतर्गत पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला होता. तर, आमदाराच्या मुलावर पोलिसांनी सामूहिक बलात्काराऐवजी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
28 मे रोजी पीडित तरुणी हैदराबादमध्ये एका पबमध्ये गेली होती. येथे ती आपल्या मित्राला भेटली. त्यानंतर या मित्राने घरी सोडण्याचे आश्वासन दिल्यामुळे पीडित मुलगी आपला मित्र आणि इतर काही मुलांसोबत मर्सिडिज कारमध्ये बसून गेली. त्यानंतर या मुलीला इनोव्हा कारमध्ये निर्जन स्थळी नेण्यात आले. येथे कारमध्ये मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.
बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल
पबमधील पार्टीची कल्पना बंगळुरुतील एका मुलाची होती आणि उस्मान अली खान नावाच्या व्यक्तीने पब बुक केला होता. यासाठी अल्पवयीन पीडितेने 1300 रुपये दिले होते. पबमध्येच तिच्यावर बलात्काराचा कट रचण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणातील आरोपींना 20 वर्षांहून अधिक तुरुंगवास, मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. तसेच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदाराच्या मुलालाही पाच ते सात वर्षाची शिक्षा होऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले.


























































