
सामना ऑनलाईन । चंदिगढ
आसाम येथील जोरहाट एअरबेसमधून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झालेल्या वायुसेनेच्या ‘एएन-32’ विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. या विमानाची शोधमोहीम गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होती. सॅटेलाईटद्वारेही विमानाचा थांगपत्ता न लागल्याने या विमानातील वायुसेनेच्या दोन पायलटच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
आसामच्या जोरहाट एअरबेसवरून उड्डाण घेतलेले एएन-32 हे विमान अरुणाचल प्रदेशच्या मेनचुका एअरबेसवर येण्यापूर्वीच संपर्काच्या बाहेर गेले. बुधवारी विमानाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पण खराब हवामानामुळे शोधमोहिमेत अडथळे आले. दोन ‘सुखोई -30 एमकेआय’ आणि एक ‘सी 130जे’ विमानाद्वारे शोधमोहीम करण्यात आली. सोमवारी दुपारी ‘एएन-32’ हे विमान बेपत्ता झाले. या विमानात वायुसेनेचे दोन अधिकारी आशीष तंवर आणि मोहित गर्ग यांच्यासह एकूण 13 जण प्रवास करीत होते.
पंतप्रधान मोदींना साकडे
विमानातील बेपत्ता पायलट आशीष तंवर आणि मोहित गर्ग यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे. शोधमोहीम जलदगतीने राबविण्यात यावी, अशी मागणी या दोन बेपत्ता अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या शोधमोहिमेसाठी आवश्यक सर्व यंत्रणांचा वापर करावा, अशी विनंतीही त्यांनी मोदींकडे केली आहे.
आशीष यांची पत्नी एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ड्युटीवर होती
या विमानाचे पायलट आशीष तंवर यांची पत्नी संध्या त्यावेळेस एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)मध्ये ड्युटी करीत होत्या. आशीष यांचे विमान बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर तासाभराने त्यांनी ही बातमी कुटुंबीयांना दिली. चार दिवसांनंतरही मुलाचा शोध लागला नसल्याने आशीष यांची आई चिंतेत आहे. त्यांनी गृह मंत्रालयाकडे शोधमोहिमेत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तर आशीष यांचे वडील आसामला पोहोचले असून त्यांचे काका उदयवीर यांनी आशीषचे विमान चुकून चीनच्या सीमारेषेत गेल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मोहित बेपत्ता झाल्याची बातमी आईपासून लपविली
- पायलट मोहित गर्ग बेपत्ता झाल्याचे अद्याप त्यांच्या आईला सांगण्यात आलेले नाही. मोहित मागील पाच वर्षांपासून जोरहाट येथे नियुक्त आहेत. विमान बेपत्ता झाल्याचे समजताच मोहित यांचे वडील आणि काका जोरहाटला रवाना झाले आहेत.
- एएन-32 च्या शोधमोहिमेत ‘सुखोई -30 एमकेआय’ आणि एक ‘सी 130जे’ विमानासह नौदलाचे टोही विमान, इस्त्रोचे सेटॅलाईट याशिवाय आता ड्रोनचीही मदत घेतली जाणार.
- एएन-32 हे विमान 1980 मध्ये हिंदुस्थानी वायुसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर हे विमान सातत्याने अपडेट होत आहे. बेपत्ता झालेले एएन-32 मात्र अपग्रेडेड विमान नाही.
- तीन वर्षांपूर्वी 22 जुलै 2016 मध्येही एएन-32 बेपत्ता झाले होते. यात 29 प्रवासी होते. चेन्नई येथून पोर्ट-ब्लेअरला जात असताना बंगालच्या खाडीनंतर या विमानाचा संपर्क तुटला.
























































