
एअर इंडिया ताब्यात घेतल्यापासून टाटा समूहाने तिला अत्याधुनिक बनवण्याचा चंग बांधला आहे. याच अनुषंगाने एअर इंडियाने विमानांची मोठी ऑर्डर दिली आहे. याआधी ही ऑर्डर 470 विमानांची असल्याची माहिती मिळाली होती. परंतु प्रत्यक्षात ही ऑर्डर तब्बल 840 विमानांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी जवळपास 85 अब्ज डॉलरचा करार झाला आहे.
एअर इंडियाच्या मुख्य अधिकारी निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने जगातील आघाडीच्या विमान उत्पादक एअरबस आणि बोईंगला जी ऑर्डर दिली आहे त्यात आणखी 370 विमाने खरेदी करण्याचा पर्याय समाविष्ट आहे. यापूर्वी ही माहिती समोर आली होती की, एअर इंडियाने एअरबसकडे 250 आणि बोईंगला 220 विमानांची ऑर्डर दिली आहे.
एअर इंडियाची विमाने खरेदी करण्याची ऑर्डर ही हिंदुस्थानी विमान वाहतूक उद्योगासाठी मैलाचा दगड आहे आणि जगभरात ज्या प्रकारचा उत्साह दिसून येत आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. 470 विमाने खरेदी करण्याच्या फर्म ऑर्डरव्यतिरिक्त, त्यात पुढील दशकात एअरबस आणि बोईंगकडून आणखी 370 विमाने खरेदी करण्याचे पर्यायी अधिकार देखील समाविष्ट आहेत, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
17 वर्षात पहिल्यांदाच एवढी मोठी ऑर्डर
टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडियाचा मालकी हक्क घेतला होता. एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर टाटा समूह आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या त्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. 17 वर्षात एअर इंडिया पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर विमान खरेदी करणार आहे. यापूर्वी 2005 मध्ये एअर इंडियाने 111 विमाने खरेदी केली होती. टाटा समूहाने मालकी घेतल्यानंतर एअर इंडियाचा हा पहिलाच करार आहे
























































