
हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. तिकीट असलेल्या प्रवाशांना विमानातक प्रवास नाकारणे व त्यानंतर त्या प्रवाशांना योग्य ती नुकसान भरपाई न दिल्याबद्दल हवाई वाहतूक विभगाने एअर इंडियावर कारवाई केली आहे.
गेल्या आठवड्यात डीजीसीएचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी सर्व विमानकपन्यांना याबाबत ताकीद देऊन सर्व नियम पाळण्यास सांगितले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून डीजीसीएकडून सर्व विमानतळांवर अचानक तपासणी केली जात आहे. ”या तपासणीदरम्यान बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली या ठिकाणी असे आढळून आले की काही विशेष घटनांमध्ये एअर इंडियाने नियमांचे पालन केलेले नाही. याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यादरम्यान हे लक्षात आले की एअर इंडियाकडे अशा प्रकारची कोणतीही पॉलिसी नसून ते प्रवाशांना नुकसान भरपाई देत नाहीत”, असे डीजीसीएच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
” ही अत्यंत गंभीर बाब असून हे अमान्य आहे. एअर इंडियाची देखील बाजू ऐकून नंतर डीजीसीएने त्यांना दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच एअर इंडियाला त्यांच्या नियमांमध्ये बदल करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत”, असे देखील या पत्रकार नमूद करण्यात आले आहे.
डीजीसीएने 2010 लागू केलेल्या नियमांनुसार जर एखाद्या एअरलाईन्सने प्रवाशांचे योग्य तिकीट असताना, दिलेल्या वेळेत तो पोहोचलेला असताना देखील त्याला विमानात प्रवेश दिला नाही तर एअरलाईन्सला त्या प्रवाशााला नुकसानभरपाई द्यावी लागते. यासोबतच अचानक फ्लाईट रद्द होणे, विमान उड्डाण उशीरा होणे अशा वेळी देखील नुकसान भरपाई द्यावी लागणार.
























































