
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
आशिया खंडात वायुप्रदूषणाचे संकट अतिशय भीषण असून 2017 मध्ये हिंदुस्थान आणि चीनमधील प्रत्येकी 12 लाख लोकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रदूषणामुळे सुमारे पाच लाख नागरीकांना स्ट्रोक, मधुमेह, हृदयविकार, फुप्फुस, कर्करोग यांसारखे विकार जडल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील न्यू ग्लोबल स्टडी आणि स्टेट ऑफ ग्लोबल स्टडीने सादर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली असून जगभरातील 50 लाख लोकांनी वायुप्रदूषणामुळे जीव गमावल्याचेही या अहवालात म्हटले आहे. वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणार्यंपैकी निम्मे लोक हे हिंदुस्थानी आहेत. घरात होत असलेल्या वायुप्रदूषणाचादेखील यात समावेश आहे. दक्षिण आशियातील वायुप्रदूषणाचे संकट अतिशय भीषण असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दक्षिण आशियात जन्म घेणार्य बालकांचे सरासरी आयुष्य दीड वर्षाने कमी होत असून ही बाब चिंताजनक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
वायुप्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू
अपघात, मलेरिया, मद्यसेवन, कुपोषण यांपेक्षा वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱयांचे प्रमाण जास्त आहे. 2016 मध्ये वायुप्रदूषणामुळे हिंदुस्थानात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये हेच प्रमाण 12 लाखांवर गेले आहे. दिल्ली, फरीदाबाद आणि गुरुग्राममधील परिस्थिती अतिशय भयंकर असून आरोग्याच्या समस्या लक्षात घेतल्यास त्यात वायुप्रदूषणाचा तिसरा क्रमांक लागतो.



























































