
‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ क्रीडा महोत्सवात बुधवारी अखेरच्या दिवशी चंदिगडचा अजय यादव सर्वाधिक ‘पुश अप्स’ मारून ‘बाहुबली’ ठरला. 24 वर्षीय या पट्टय़ाने 737 ‘पुश अप्स’ मारून उपस्थित प्रेक्षकांना अचंबित करून टाकले. महिला गटात श्रेया मांडवे हिने सर्वाधिक 91 ‘पुश अप्स’ मारत बाजी मारली. या दोघांनाही प्रत्येकी 25 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
आदर्श सोमाणी यांनी आपले वडील राजेंद्र सोमाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ या क्रीडा महोत्सवात देशभरातील 17 हजार खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेतील विजेत्यांना मुंबईत लवकरच एक दिमाखदार कार्यक्रम घेऊन रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल. टॉप-10 खेळाडूंना एक कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. पुरुष आणि महिला गटासाठी सारखीच बक्षीस रक्कम असेल हे विशेष. उर्वरित 80 खेळाडूंना 14 लाख रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. 25 लाख, 15 लाख, 10 लाख, 1 लाख 25 हजार, 1 लाख 20 हजार, 1 लाख 10 हजार, एक लाख, 90 हजार, 80 हजार व 75 हजार असे टॉप-10 बक्षिसांचे स्वरूप होय.
आई–वडिलांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार!
माझे वडील प्रभुनाथ हे माळी काम करतात. आई गृहिणी आहे. स्वतःचे घर नसल्याने आम्ही भाडय़ाच्या घरात राहतो. आता 25 लाख रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरल्याने साहजिकच आनंद झालाय. आता या पैशातून आई-वडिलांचे स्वतःच्या घराचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया अजय यादवने दिली.



























































