
‘‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरू आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. मात्र, त्याच्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे, तो होताना दिसत नाही,’’ अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर यांनी स्वातंत्र्यलढय़ाबरोबरच जातिअंताचा लढा उभा केला. त्या काळी त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. आतासुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत.’’
‘‘अलीकडे ‘सेक्युलर’ या शब्दालाच कुठेतरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काहीजण करतात. हे आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे होणार आहे. पहाटेच्या शपथविधीपेक्षा आपण महागाई, बेरोजगारी असे आत्ताचे जे काही यक्षप्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यांच्याबद्दल या मीडियाचाही वापर करून लोकांना जागृत करू,’’ असेही पवार यावेळी म्हणाले.
कासेगाव येथील क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी दोन विधानपरिषद सदस्यांच्या निधीतून एकूण 22 लाख आणि ‘सीएसआर’मधून पाच लाखांचा निधी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांचे लक्ष ‘त्या’ 40 आमदारांकडेच!
सातारा ः ‘‘राज्यात सत्तेवर आलेले सरकार हे ‘स्थगिती सरकार’ असून, त्यांना राज्याच्या विकासाशी कोणतेही देणेघेणे नाही. सरकार बदलल्यानंतर मागच्या सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिली जात नव्हती. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ज्या 40 आमदारांच्या जीवावर शिंदे मुख्यमंत्री झाले, त्या 40 आमदारांकडेच ते लक्ष देत आहेत. इतरत्र लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. हे सरकार एकाही महिलेला साधे मंत्रिपद देऊ शकले नाही. एकेक मंत्री चार ते पाच जिह्यांचे पालकमंत्रिपद गेले सहा महिने सांभाळत आहेत. त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार?’’ असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला. कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे विकास सोसायटीची नूतन वास्तू व ग्रामपंचायत प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

























































