जे झालं ते मनाला लावून न घेता काँग्रेससोबत या, अजित पवारांचा सत्यजीत तांबेंना सल्ला

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी कडवी झुंज दिली, मात्र सत्यजीत तांबे यांनी त्यांचा पराभव केला. या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांना एक सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की सत्यजीत तांबे निवडून आल्याने त्यांना आता सगळेजण आपल्याकडे बोलावण्याचा प्रयत्न करतील. सत्यजीत तांबे यांना पुढची बरीच वर्ष राज्याच्या राजकारणात काम करायचे आहे,त्यामुळे नीट विचार करून सत्यजीत यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दीड महिन्याच्या काळात जे काही झालं त्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी मनाला जास्त लावून घेऊ नये. माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे वडील डॉ.सुधीर तांबे हे घरातलेच आहेत. त्यामुळे सत्यजीत यांनी त्यांचे ऐकावे, कारण वडीलधाऱ्यांचे आपण ऐकत असतो. याऊपर काय करावे हा सत्यजीत यांचा अधिकार आहे. पण त्या मतदारसंघात त्यांना इतकी मते मिळत असताना, मविआतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते आहे. त्याला निवडून आणण्यासाठी त्याचे स्वत:चे निवडणुकीचे तंत्र आणि काही मविआतील लोकांनी किंवा मतदारांनी दिलेली साथ त्यामुळे एढं देदीप्यमान यश मिळू शकलं.