
राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून वेगळा झालेला अजित पवार गटाने संपूर्ण राष्ट्रवादीवरच आपला दावा ठोकला आहे. या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान आता लोकसभा निवडणूका काही महिन्यांवर आल्याने अजित पवार गटाकडून देखील उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. यात एक नाव अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे असून त्या चक्क बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता बारामतीत नणंद भावजय अशी टक्कर पाहायला मिळणार की काय अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का? असा सवाल पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी देखील त्यावर थेट नकार न देता उडवा उडवीचे उत्तर दिले. ”आम्ही या गोष्टीचा विचार करू. जेव्हा वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल असे सांगितले.
दरम्यान यावर प्रतिक्रीया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”कुणी ना कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच त्यामुळे आपण अशा गोष्टींचं स्वागत केलं पाहिजे. दिल्लीत काय दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पाहतोय. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटतं की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे.” असे त्या म्हणाल्या.


























































