आजरा तालुक्यातील भादवण येथे अनैतिक संबंधातून खून, उसाचा फड पेटवून प्रेत जाळण्याचा झाला प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजरा  तालुक्यातील भादवण येथे उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. आशाताई मारुती खुळे या 42 वर्षीय महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, आजरा पोलिसांनी याप्रकरणी स्थानिक ट्रक्टरचालक योगेश पाटील याला अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

भादवण व भादणवाडी रस्त्यावर दीपक खुळे, आनंदा देवरकर यांच्या उसाच्या शेताला गुरुवारी सायंकाळी आग लागली होती. ती विझविण्यासाठी ग्रामस्थ गेले असता, त्या ऊसात आशाताई खुळे या महिलेचा जळालेला मृतदेह आढळला होता. सुरुवातीला जरी ऊस जळाल्याने सदर महिला मृत पावली असल्याचे दिसत असले, तरी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. ऊस कशामुळे जळाला व महिला तेथे कशी आली? ऊस पेटला की पेटवला, असे विविध प्रश्न उपस्थित होत होते.

गुरुवारी रात्री या घटनेची नोंद आजरा पोलिसांत झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळवली असता, हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, योगेश पाटील दिसून आला. तसेच पोलीस पथकातील श्वान माग काढत पाटील याच्या घराकडे गेला होता. याप्रकरणी योगेश पाटील या ट्रक्टरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलिसांचा खाक्या दाखवताच, त्याने खुनाची कबुली दिली.

आशा यांनी त्याला शारीरिक संबंधाला नकार दिल्याने खुळे यांचा गळा दाबून खून केल्यानंतर ओळख उघडकीस येऊ नये म्हणून संपूर्ण उसाचा फड पेटवल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.