
ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम याने सोमवारी अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत इतिहास रचला. 27 वर्षीय या खेळाडूने जर्मनीच्या ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव या 23 वर्षीय टेनिसपटूला 6-2, 6-4, 6-4, 6-3, 7-6 अशा फरकाने पाच सेटमध्ये पराभूत करीत पहिल्यावहिल्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले. पहिले दोन सेट गमावल्यानंतर अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारा डॉमिनिक थीम हा 1949 सालानंतरचा पहिलाच खेळाडू ठरलाय. याआधी अमेरिकेच्या पँचो गोंझालेस याने अमेरिकेच्याच टेड क्रोडर याला 16-18, 2-6, 6-1, 6-2, 6-4 असे हरवत अमेरिकन स्पर्धा जिंकली होती. डॉमिनिक थीमने चौथ्या प्रयत्नांत पहिले ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावले हे विशेष. कोरोनानंतर झालेल्या पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीतील जेता चार तास व एक मिनिटाच्या थरारानंतर मिळाला.
आज दोन चॅम्पियन व्हायला हवे होते – थीम
जेतेपद पटकावल्यानंतर डॉमिनिक थीम भावुक झाला. याप्रसंगी तो म्हणाला, 2014 सालापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. त्यावेळी शंभरच्या जवळपास आम्हा दोघांची रँकिंग होती. तिथपासून आम्ही एकमेकांचे मित्र झालो. 2016 सालापासून टेनिस कोर्टवर आमची एकमेकांविरुद्ध स्पर्धा सुरू झाली. टेनिस कोर्ट असो किंवा बाहेरचे जग, आमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडताहेत. या प्रवासात आम्ही इथपर्यंत मजल मारलीय. आज खरोखर असे वाटू लागले की, दोन चॅम्पियन व्हायला हवे होते.
ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियन होणारच – झ्वेरेव
उपविजेता ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव यावेळी म्हणाला, ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियन होण्याच्या जवळ पोहोचलो होतो. काही पॉइंट मी जेतेपद पटकावण्यापासून दूर होतो. पाचव्या सेटमध्ये विजयासमीप असताना मला त्या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे वेदना होत आहेत. आता माझे वय 23 आहे. त्यामुळे मी अजूनही मैदान सोडलेले नाही. भविष्यात ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियन नक्कीच होईन असा विश्वास पुढे त्याने व्यक्त केला.
या आकडेवारीवर एक नजर
- 2014 सालानंतर ग्रॅण्ड स्लॅममध्ये नवा चॅम्पियन मिळाला. याआधी मरीन सीलिचने 2014 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
- डॉमिनिक थीम ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रियाचा दुसराच टेनिसपटू ठरला. याआधी थॉमस मुस्टरने 1995 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.
- पहिले दोन सेट गमावल्यानंतर अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारा डॉमिनिक थीम 1949नंतरचा पहिलाच खेळाडू ठरला.
- रॉजर फेडरर, रफाएल नदाल व नोवाक जोकोविच यांच्या व्यतिरिक्त ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारा डॉमिनिक थीम 2016 सालानंतरचा पहिलाच टेनिसपटू ठरला.
- 90च्या दशकात जन्म झालेला डॉमिनिक थीम हा पहिलाच ग्रॅण्ड स्लॅम चॅम्पियन ठरला.
- अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारा डॉमिनिक थीम हा ऑस्ट्रियाचा पहिलाच खेळाडू ठरला.
- अमेरिकन ओपन स्पर्धा टाय ब्रेकरमध्ये जिंकणारा डॉमिनिक थीम पहिलाच खेळाडू ठरला.
- डॉमिनिक थीमला चौथ्या प्रयत्नात ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन होता आलेय
- ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा डॉमिनिक थीम 150वा खेळाडू ठरलाय. तसेच ओपन इरामध्ये (1968 सालापासून) ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा तो 55वा खेळाडू .
डॉमिनिक थीम – ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव लढतीची आकडेवारी
झ्वेरेव थीम
एसेस 15 8
दुहेरी चुका 15 8
विनर्स 52 43
अनफोर्स एरर 65 55
एकूण गुण 159 163


























































