
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणताही घोटाळा झाला नसल्याचं स्पष्टीकरण अमेरिकेच्या निवडणूक आयोगाने दिलं आहे. उलट हे आजपर्यंतचं सर्वात सुरक्षित मतदान असल्याचंही आयोगाचं म्हणणं आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन यांचा विजय झाला. बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य करण्यास ठाम नकार दिला असून निवडणुकीत आपल्याला 7 कोटींपेक्षा जास्त वैध मते मिळाल्याचा दावा केला होता. तसेच निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
बायडन अमिेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांना 273 इलेक्टोरल मते मिळाली असून ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मते मिळाली. निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून आपल्यला 7 कोटी 10 लाख वैध मते मिळाली. आतापर्यंत राष्ट्राध्यक्षाला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. त्यामुळे निवडणुकीत आपलाच विजय झाला आहे. पर्यवेक्षकांना मतमोजणीच्या कक्षाच प्रवेश देण्यात आला नाही. तसेच जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात मेल इन बॅलेट पोहचवण्यात आले. त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. मतदानाची मुदत संपल्यावर आठ वाजेनंतर मेल इन बॅलेटद्वारे आलेल्या मतांचीही मोजणी करण्यात आली, ते अयोग्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.
ट्रम्प आपला पराभव स्वीकारण्यास नकार दिला होता. बायडन यांनी अयोग्य पद्धतीने राष्ट्राध्यक्षपदावर दावा करू नये. निवडणुकीत आपलाच विजय झाला आहे. त्यामुळे बायडेन या पदावर दावा करू शकत नाही. निवडणुकीचे निकाल लागले नसून आता खरी कायदेशीर लढाई सुरू झाल्याचे ट्रम्प म्हणाले होते. सलग तीन ट्विट करत ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्यावर अमेरिकेच्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. अमेरिकेच्या निवडणूक इतिहासातील आजवरचं सर्वात सुरक्षित असं मतदान झाल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. या मतमोजणीचं प्रक्षेपण सर्व प्रमुख वाहिन्यांनी दाखवलं आहे. त्यामुळे त्यात घोटाळा होण्याची काहीही शक्यता नाही.
तूर्तास निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी मतांची पुनर्मोजणी करत आहेत, जेणेकरून कुठेही संशयाला जागा राहू नये. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, अन्य लोकांनीही तो ठेवणं अपेक्षित आहे, असं मत आयोगाने ट्रम्प यांचं नाव न घेता व्यक्त केलं आहे.

























































