
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशातील सर्व शेतकर्यांचे कर्ज माफ करावे अशी विनंती केली आहे. तसेच शेतकर्यांसाठी देशाला हे कडू औषध घ्यावे लागेल असेही सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे.
सिंह यांनी पत्रात म्हटले आहे की, “देशात कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या सर्व शेतकर्यांची राष्ट्रीय स्तरावर कर्जमाफी करावी. यामुळे शेतकर्यांचे संकट कमी होईल. हे कडू औषध आहे जे हिंदुस्थानला घ्यावे लागेल. देशातील बहुतांश शेतकरी हे कर्जात अडकले आहेत. त्यामुळेच अनेक शेतकर्यांनी आत्महत्येसारखे दुर्दैवी पाऊल उचलले आहे.” तसेच पंजाब सरकारने आपल्या स्तरावर राज्यातील छोट्या आणि मध्यम शेतकर्यांचे दोन लाख पर्यंत कर्जमाफ केले आहे. आतापर्यंत राज्यातील 5.52 लाख शेतकर्यांचे 4 हजार 468 कोटी रुपये कर्ज आपण माफ केले असून उर्वरित शेतकर्यांचेही कर्ज माफ होईल अशी माहिती सिंह यांनी दिली.
पंजाब सरकारने ही कर्जमाफी आपल्या मर्यादित साधनांच्या माध्यमातून दिली असून ती अपूरी आहे. यात केंद्र सरकारच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान कृषी योजनेअंतर्गत जी कृषी पेन्शन योजना केली आहे ती अपुरी असल्याचे सिंह यांनी सांगितले. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक प्रश्न सुटणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
दुसर्या एका पत्रात मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करावे. ही योजना पूर्वीपेक्षा चांगली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. ही योजना शेत किंवा भुखंडावर आधारित नसावी. ही योजना शेतकर्याने आधी कुठले पीक घेतले आहे त्यावर आधारित असावी अशी मागणी सिंह यांनी केली आहे. तसेच कापणी नंतर पिकाला बाजारात भाव मिळत नाही. विमा योजनेत हा मुद्दाही असावा असेही त्यांनी पत्रद्वारे सुचवले आहे.
तसेच कृषी विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तींचाही समावेश असावा. रब्बी पिकांमध्ये अवकआळी पाऊस आणि खरीप पिकांमध्ये कमी पावसाचा समावेश योजनेत करावा असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.
























































