झोपडपट्टीवासीयांचा ‘वंदे भारत’वर राग! मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाडीवर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vande-bharat-express

एसी लोकल ट्रेननंतर आता सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या ‘वंदे भारत’ ट्रेनवर झोपडपट्टीवासीयांचा राग असल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘वंदे भारत’ ट्रेनवर दगडफेक होण्याच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाडीवरही रविवारी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या झोपडपट्टी परिसरातून झालेल्या दगडफेकीमुळे ‘वंदे भारत’ ट्रेनच्या काचेला तडे गेले आहेत. त्यामुळे रेल्वे पोलीस अलर्ट झाले आहेत.

मुंबईकरांना शिर्डी आणि सोलापूरला कमी वेळेत पोहोचता यावे म्हणून रेल्वेने दोन्ही मार्गावर ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू केल्या असून त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी मुंबईत उपनगरीय मार्गावर सुरू केलेल्या एसी लोकलवर कळवा, मुंब्रा, दिवा, कांजुरमार्ग परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्याचीच पुनर्रावृत्ती पुण्यात झाली असून रविवारी सायंकाळी सोलापूरला जाणारी ‘वंदे भारत’ ट्रेन पुणे स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली आहे. यामध्ये गाडीची काच फुटली आहे. मात्र सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी दगडफेक करणाऱ्यांचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याआधीही पुणे येथील शिवाजीनगर परिसरातून ‘वंदे भारत’ ट्रेनवर दगडफेक झाली होती.